चंद्रपूर : ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत नागभीड वनपरिक्षेत्रातील मिंडाळा उपक्षेत्रातील मांगली कक्ष क्रमांक ४८ मध्ये मंगळवारी (दि.१७) एका अस्वलाच्या पिल्लाचा मृतदेह आढळून आला. या पिल्लाचे वय अंदाजे एक वर्ष असून त्याच्या मृत्यूचे कारण हिस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी बिट वनरक्षक कु. एल. एस. भांवडे हे जंगलात गस्त घालत होते. यावेळी त्यांना मांगली बनवाही रस्त्यालगत कक्ष क्र. ४८ मध्ये अस्वलाचे पिल्लु मृत अवस्थेत आढळून आले. त्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार तत्काळ घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. कन्नमवार, क्षेत्र सहायक एम. व्ही. तावडे, वनरक्षक जी. एम. नवधरे आणि अन्य वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेहाचे निरीक्षण केले असता शरीरावर हिस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ल्याच्या खुणा स्पष्ट दिसून आल्या. या पार्श्वभूमीवर मृतदेह नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात आणून मान्यवरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये एम.व्ही.गायकवाड (सहायक वनसंरक्षक, तेंदू विभाग), ए. आर. कन्नमवार, डॉ. ममता चाटसाईडे (सहायक आयुक्त, पं.स. नागभीड), पवन नागरे (अध्यक्ष, डोप निसर्ग संस्था) यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर मृत पिल्लाचे दहन करण्यात आले. याबाबत उपवनसंरक्षक मा. राकेश शेपट व सहायक वनसंरक्षक मा. एम. सी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.