प्रेमसंबंधाच्या आड येणाऱ्या पतीची हत्या; पत्नीच्या प्रियकरासह सहकारी अटकेत Pudhari File Photo
चंद्रपूर

Chandrapur Murder | प्रेमसंबंधाच्या आड येणाऱ्या पतीची हत्या; पत्नीच्या प्रियकरासह सहकारी अटकेत

कोरपना तालुक्यातील नारंडा परिसरात धक्कादायक घटनाः पूर्वी झालेल्या वादातून घेतला सूड

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील नारंडा येथे प्रेमसंबंधाच्या आड येत असल्याच्या संशयावरून पत्नीच्या प्रियकरानेच पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून मुख्य आरोपी बादल सोनी आणि त्याचा साथीदार तुषार येणगंटीवार यांना कोरपना पोलिसांनी अटक केली आहे.

कोरपना तालुक्यातील नारंडा येथील एका नाल्याजवळ रविवारी संध्याकाळी नितेश रामदास वाटेकर (रा. नारंडा) हा गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या डोक्याला जोरदार मारहाण झालेली दिसून आली. तात्काळ कोरपना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नितेश याचे वनसडी येथे हेअर सलूनचे दुकान असून तो दररोज दुचाकीने अप-डाउन करत असे. त्या दिवशी रात्री उशीरपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांना संशय आला. काही ग्रामस्थांनी एका नाल्याजवळ नितेश दुचाकीसह पडलेला पाहिल्याची माहिती त्याच्या भावाला दिली. घटनास्थळी धाव घेतल्यावर त्याच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे दिसून आले.

सन २०२२ पासून नितेश हा गडचांदूर येथे पत्नी साधना आणि मुलीसह भाड्याने राहत होता. याचदरम्यान साधनाचे बादल सोनी नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले होते. या कारणावरून गणेशोत्सवाच्या काळात नितेश आणि बादल यांच्यात वाद झाला होता. त्या वेळी बादलने नितेशला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. साधनाने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती, मात्र बादलने माफी मागितल्याने आणि कुटुंब उध्वस्त होऊ नये या कारणास्तव तक्रार मागे घेण्यात आली.

मात्र सोमवार, दिनांक १६ रोजी बादल सोनी आपल्या एका मित्रासह वनसडी येथे मद्यपान करत होता. त्याचवेळी नितेश घरी परतत असताना आरोपींनी त्याला अडवून डोक्यावर भारी वस्तूने प्रहार केला तसेच गळा आवळून ठार केले, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी वेगाने तपास सुरू करून आरोपी बादल सोनी व त्याचा सहकारी तुषार येणगंटीवार (रा. गडचांदूर) यांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 103(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लता वाडिये यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक देवानंद केकन आणि कोरपना पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT