कारल्याच्या भाजी आवडली नाही, मद्यधुंद मुलाकडून आईचा खून Pudhari File Photo
चंद्रपूर

Chandrapur Murder | कारल्याच्या भाजी आवडली नाही, मद्यधुंद मुलाकडून आईचा खून

मूल तालुक्यातील डोंगरगाव हादरले; आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कारल्याची भाजी बनवल्याच्या किरकोळ कारणावरून मुलाने स्वतःच्या आईची मारहाण करून हत्या केल्याची माहिती समोर आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे सुमित्रा पेटकुले (वय ६५) यांची त्यांचा मुलगा जगदीश पेटकुले याने बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली. घरात कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून आई-मुलामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या अमानुष मारहाणीत सुमित्रा पेटकुले यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला दारूचे व्यसन असून तो मद्यधुंद अवस्थेत घरी आला होता. दोन महिन्यांपूर्वी पत्नी घर सोडून गेल्यानंतर तो आईसोबत राहत होता. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी आरोपी जगदीश पेटकुले याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे डोंगरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो याचे भीषण उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT