Pratibha Dhanorkar Congress
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेससाठी धक्कादायक निकाल समोर आले असून, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जवळच्या दोन प्रमुख नेत्यांचा पराभव झाला आहे. महानगर काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याने शहरातील काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला अंतर्गत बंडखोरी आणि भाजपच्या आक्रमक रणनीतीचा फटका बसल्याचे चित्र आहे.
काँग्रेसचे विद्यमान महानगर अध्यक्ष संतोष गुलाबराव लहामगे हे प्रभाग क्रमांक 12-डी मधून उमेदवार होते. मात्र काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे नंदू नागरकर यांनी त्यांचा पराभव केला. पक्षाच्या शहराध्यक्षाचा अपक्ष उमेदवाराकडून पराभव होणे, ही काँग्रेससाठी अत्यंत नामुष्कीची बाब मानली जात आहे.
याचप्रमाणे काँग्रेसचे माजी महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे उमेदवार प्रज्वलंत प्रमोद कडू यांनी त्यांना पराभूत करत विजय मिळवला. ते याच प्रभाग 12 क उभे होते. रामू तिवारी हे शहरातील काँग्रेसचे अनुभवी नेते मानले जात असून, त्यांच्या पराभवामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे संतोष लहामगे आणि रामू तिवारी हे दोन्ही नेते खासदार प्रतिभा धानोरकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दोघांचा पराभव म्हणजे अप्रत्यक्षपणे खासदार धानोरकर यांना बसलेला राजकीय धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या निकालामुळे चंद्रपूर शहर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद, बंडखोरी आणि नेतृत्वातील समन्वयाचा अभाव उघड झाला आहे.