

Bramhapuri Tractor Crash Laborers Death
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी जवळील गोगाव – सायगाव मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली पलटून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. 15) साडेतीन च्या सुमारास घडली. प्रवीण भोयर (वय ३७) व शिवाजी दोडके (वय ५५) दोघेही रा. गोगाव असे मृतांची नावे आहेत.
गेल्या पंधरा दिवसापासून नागभीड तालुक्यातील जनकापुर येथील ठेकेदारामार्फत सिंदेवाही तालुक्यात गोगाव येथील सात मजूर हे लाकूड तोडण्याच्या कामावर गेले होते. मकर संक्रात असल्याने काम आटपून स्वगावी परत येत असताना गोगाव – सायगाव मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली पलटून अपघात झाल्याने सात जणांतील ट्रॉलीवर बसलेले दोघेजण प्रवीण भोयर (वय ३७) व शिवाजी दोडके (वय ५५) यांचा ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्याने जागीच दबून मृत्यू झाला.
ट्रॅक्टर इंजिन वर बसलेले पाच मजूर हे या अपघातात सुखरूप बचावले. सदर ट्रॅक्टर हे जनकापूर येथील लाकूड ठेकेदाराची असल्याची प्राप्त माहिती आहे. घटनेची माहिती मेंडकी पोलिसांना मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास मेंडकी पोलीस करीत असून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सणासुदीच्या दिवशी कुटुंबीयांवर काळाचा आघात झाल्याने भोयर व दोडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.