BJP vs Congress Chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी शहराच्या राजकारणात कमालीची उत्कंठा निर्माण केली आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यातील फरक अत्यंत कमी असून, महापालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. विजयी उमेदवारांची संख्या पाहता चंद्रपूरमध्ये काट्याची राजकीय लढत रंगली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालात काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट आणि अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. काँग्रेसने २३ जागांवर विजय मिळवला असून त्यामध्ये मित्रपक्ष जनविकास सेनेच्या ३ जागांचा समावेश आहे. काँग्रेसने यावेळी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला फक्त जनविकास सेना त्यांच्या सोबतीला या ठिकाणी आहे. दुसरीकडे भाजपने २१ जागांवर विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे चंद्रपुरात महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच शिवसेना (ठाकरे गट) ६ जागांवर विजयी ठरली आहे. शिवसेना ठाकरे गटाने वंचित सोबत युती केल्याने त्याचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाची विजय उमेदवारांची संख्या काँग्रेस आघाडीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. याशिवाय एमआयएम, बसपा, वंचित, शिंदे गटाची शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनीही प्रत्येकी १ ते २ जागांवर विजय मिळवला आहे. या छोट्या पक्षांचे आणि अपक्षांचे संख्याबळ तुलनेने कमी असले, तरी सत्तास्थापनेच्या दृष्टीने त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, काँग्रेसने संख्यात्मक आघाडी मिळवली असली तरी भाजपही फार मागे नाही. २१ जागांसह भाजप मजबूत विरोधी पक्ष किंवा सत्तास्थापनेसाठी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. विशेषतः अपक्ष आणि छोट्या पक्षांशी संवाद साधत भाजप सत्ता समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करेल, अशी चर्चा आहे.
काँग्रेस आघाडीसमोरही आव्हाने कमी नाहीत. अंतर्गत मतभेद, बंडखोरीचे परिणाम आणि काही प्रमुख नेत्यांचे पराभव यामुळे पक्षांतर्गत समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र जनविकास सेना आणि ठाकरे गटाची संभाव्य साथ काँग्रेसला सत्तेच्या अधिक जवळ नेत असल्याचे चित्र आहे.
एकूणच चंद्रपूर महानगरपालिकेचा निकाल हा स्पष्ट बहुमताऐवजी तुटपुंज्या फरकाचा असल्याने, सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. काँग्रेस की भाजप, यापैकी कोण बाजी मारते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेना ठाकरे गट 6
काँग्रेस - 23
(मित्र पक्ष जनविकास सेनेचे 3 जोडून)
भाजप - 21
एमआयएम- 1
बसपा 1
वंचित 1
शिवसेवा (शिंदे गट) 1
अपक्ष 2