Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Politics | चंद्रपूर महापालिका स्थायी समितीची निवडप्रकिया; काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

Congress Internal Rift Chandrapur | वडेट्टीवार गटाचा धानोरकर गटाला खो

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur CMC Standing Committee Chairman election

चंद्रपूर : चंद्रपूर ब्युरो महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची गुरुवारी (दि५) निवड करण्यात आली. १६ सदस्यांच्या समितीत काँग्रेसच्या वाट्याला ७ जागा आल्या असल्या तरी सर्वच सदस्य विजय वडेट्टीवार गटाने काबीज केल्याने खासदार प्रतिभा धानोरकर गटाला एकही स्थान मिळाले नाही. या निर्णयामुळे नाराज झालेल्या धानोरकर गटाचे नगरसेवक महासभेवर बहिष्कार टाकत सभागृहातून बाहेर पडल्याने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

महानगरपालिकेत गुरुवारी पार पडलेल्या पहिल्या महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली. सभागृहातील पक्षीय संख्याबळानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली.  

वडेट्टीवार गटाने धानोरकर गटाला खो दिल्याची चर्चा नंतर रंगली. आता स्थायी समिती सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर संगीता खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता मनपाच्या राणी हिराई सभागृहात महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर प्रशांत दानव, आयुक्त अकुनुरी नरेश, उपायुक्त संदीप चिद्रवार, उपायुक्त शेषराव टाले, नगरसचिव नरेंद्र बोबाटे तसेच सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.

स्थायी समिती सदस्य निवडीचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला. संबंधित पक्षांच्या गटनेत्यांनी संख्याबळानुसार सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात सादर केली. त्यानंतर महापौरांनी सदस्यांची अधिकृत घोषणा केली.

यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ७,भारतीय जनता पार्टी,शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे ६, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व वंचित बहुजन आघाडी गटाचे २ व महानगर आघाडी गटाच्या एका सदस्याचा समावेश आहे. नवनिर्वाचित सदस्यांचे महापौर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. स्थायी समिती सभापतीपदासाठी विभागीय आयुक्त निवडणुक कार्यक्रम जाहीर करतील त्यानुसार पुढील काही दिवसात निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT