CMC Election Polling Stations Chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी उद्या शहरात मतदान होणार असून, या प्रक्रियेसाठी निवडणूक प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. मतदान शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील १७ प्रभागांमधून ६६ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १ ते १५ मधून प्रत्येकी ४ सदस्य, तर प्रभाग क्रमांक १६ व १७ मधून प्रत्येकी ३ सदस्य निवडले जाणार आहेत.
या निवडणुकीसाठी शहरात एकूण ३५५ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदानासाठी एकूण २ लाख ९९ हजार ९९४ मतदार नोंदणीकृत असून, त्यामध्ये १ लाख ४९ हजार ६०९ पुरुष, १ लाख ५० हजार ३५४ महिला आणि ३१ इतर मतदारांचा समावेश आहे. सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ५२.५६ टक्के मतदान झाले होते.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी २,२०७ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी शहरात संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्रे नाहीत. मतदारांच्या सोयीसाठी आर.ओ. निहाय एकूण ५ पिंक मतदान केंद्रे तसेच ४ परदानशीन मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
निवडणूक काळात तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक १८००३०९७०४० आणि व्हॉट्सअॅप क्रमांक ९०११०९५१६८ कार्यरत होते. या माध्यमातून प्राप्त झालेल्या २१ तक्रारींपैकी सर्व २१ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून कोणतीही तक्रार प्रलंबित नाही.
आचारसंहिता अंमलबजावणीसाठी एकूण ४१ पथके कार्यरत असून, यामध्ये स्थायी निगराणी पथके (SST), व्हिडिओ देखरेख पथके (VST), फिरती पथके (FST) आणि व्हिडिओ परीक्षण पथकांचा (VVT) समावेश आहे. आचारसंहिता कक्षामार्फत २ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या असून २ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
संभाव्य दुबार मतदारांसाठी मतदान केंद्रनिहाय मतदार यादीत शिक्के मारणे व परिशिष्ट-२ भरून घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तसेच, पोस्टल बॅलेटसाठी पात्र कर्मचाऱ्यांसाठी ९ ते १२ जानेवारीदरम्यान चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयात सुविधा केंद्र उभारण्यात आले होते.
मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी मनपा झोन क्रमांक ३, बंगाली कॅम्प येथे स्ट्रॉंग रूमची व्यवस्था करण्यात आली असून, तेथे १६ सीसीटीव्ही कॅमेरे, अग्नि प्रतिबंधक यंत्रणा व अन्य सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी EVM कमिशनिंग प्रक्रिया पार पडली असून, सर्व यंत्रे तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याची खात्री करण्यात आली आहे.
आज १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य व EVM यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. उद्या मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजतापासून सर्व साहित्य सील करून पुन्हा स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात येणार आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून, उद्याचा दिवस शहराच्या राजकीय भविष्याचा कौल ठरवणारा ठरणार आहे.