

चंद्रपूर : नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का देत बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची नगरपरिषद असलेल्या नागभीड येथे काँग्रेसने भाजपची सत्ता उलथवून लावत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र आज पार पडलेल्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून काँग्रेसमध्येच नाराजी नाट्य उघडकीस आले आहे.
नुकत्याच झालेल्या नागभीड नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने मोठे यश संपादन करत नगराध्यक्ष सह एकूण 21 पैकी 14 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला केवळ ६ जागा आणि एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला. या निकालामुळे भाजपची मागील सत्ता उलथवून काँग्रेस सत्तेत आली असून नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या स्मिता प्रफुल खापर्डे यांची निवड झाली आहे.
सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. अशातच आज मंगळवारी नागभीड नगरपरिषदेत उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये उपाध्यक्षपदी प्रतीक भसीन यांची निवड करण्यात आली, तर स्वीकृत सदस्य म्हणून सत्ताधारी काँग्रेसकडून दिनेश गावंडे आणि विरोधी पक्ष भाजपकडून अमीर धम्माने यांची निवड करण्यात आली.
मात्र या निवडीच्या पूर्वीच काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला वेग आला असून नागभीड तालुका काँग्रेस कमिटीमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी सोशल मीडियावर आज सकाळी टाकलेल्या पोस्टमधून आपली तीव्र नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आपल्या पोस्टमध्ये प्रमोद चौधरी यांनी “ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच विश्वासघात केला,” असा आरोप करत पक्षातील काही नेत्यांवर थेट निशाणा साधला आहे. पाच वर्षे पक्ष व संघटनेत सक्रिय नसलेल्या नेत्यांना संधी देण्यात येते, तर प्रत्यक्ष लढा देणाऱ्या व काम करणाऱ्यांना डावलले जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. मागील पंचवार्षिक काळातही असाच प्रकार घडल्याचे नमूद करत, “ही काँग्रेसची संस्कृती आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
या नाराजीमुळे नागभीड तालुक्यातील काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून, सत्तेच्या आनंदावर पक्षातील वादाचे सावट पसरले आहे. आगामी काळात या नाराजीचा पक्षसंघटनेवर व नगरपरिषदेच्या कारभारावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.