Tiger Attack Pudhari Photo
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack | मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ! ताडाळा नदीकिनारी कापूस वेचणारी महिला ठार; फिस्कुटीत शेतकऱ्यावरही झडप

वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत

पुढारी वृत्तसेवा

Mul Taluka Woman Killed In Tiger Attack

चंद्रपूर : मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांच्या घटनांनी पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. बुधवारी (दि.११) एकाच दिवशी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिला शेतमजुराला जीव गमवावा लागला. तर ६६ वर्षीय शेतकरी वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला. ताडाळा नदीकिनारी कापूस वेचणीचे काम करीत असताना वाघाने महिलेवर हल्ला केला. तर फिस्कुटी येथील शेतशिवारात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यावरही वाघाने अचानक झडप घातली. या घटनांमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

ताडाळा नदीकिनारी महिला शेतमजुराचा मृत्यू

ताडाळा येथील रहिवासी संगीता कृष्णा पेळूकर (वय ५८) या गुरुवारी कापूस वेचणीसाठी शेतात गेल्या होत्या. त्यांच्यासोबत अन्य महिला शेतमजूरही काम करीत होत्या. दरम्यान, सायंकाळी सुमारे चार वाजताच्या सुमारास ताडाळा नदीकिनारी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात संगीता पेळूकर यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने ताडाळा परिसरात शोककळा पसरली असून शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

फिस्कुटीत ६६ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाची झडप

दुसऱ्या घटनेत विरई येथील रहिवासी दयाराम केशव मोहुर्ले (वय ६६) हे फिस्कुटी येथील शेतशिवारात कामासाठी गेले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच त्यांचे पुत्र अमित मोहुर्ले यांनी जखमी वडिलांना तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

शेतात जायचे तरी कसे? शेतकरी-शेतमजूर धास्तावले

सध्या कापूस वेचणीसह रब्बी हंगामातील शेतीची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांवर वाघाच्या हल्ल्यांचे सावट निर्माण झाले आहे. शेतीची कामे करणे गरजेचे असताना जीव मुठीत धरून शेतात जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वनविभागाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन ताडाळा, फिस्कुटी आणि परिसरातील गावांमध्ये गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी तसेच शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे आता शेतीची कामे करायची तरी कशी, असा प्रश्न मूल तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT