Chandrapur Illegal Tobacco Transport Pudhari
चंद्रपूर

Tobacco Seizure Chandrapur | मूल पोलिसांची मोठी कारवाई; ६.९९ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पिकअप जप्त

गोंदियाहून मूलकडे सुरू होती अवैध तंबाखू वाहतूक, उमा नदी नाक्यावर सापळा रचून चालकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Illegal Tobacco Transport

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोलिसांनी अवैध तंबाखू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत ६ लाख ९९ हजार ७५० रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, खुला तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन जप्त केले. एमआयडीसी मूल परिसरातील उमा नदी नाक्यावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. गोंदियाहून मूलकडे प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मूल पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी प्रोव्ही रेड पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे उमा नदी नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी गोंदियाकडून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच ३५ एजे ३५९५) वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व खुल्या तंबाखूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस आले.

झडतीदरम्यान वाहनातून 'होल हुक्का शिशा' या ब्रँडचा तीन प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये व ३० प्लास्टिक बांध्यांमध्ये भरलेला एकूण ३० किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, तसेच २० प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये खुला तंबाखू असा माल आढळून आला. जप्त तंबाखूची किंमत १ लाख ९९ हजार ७५० रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअपची किंमत ५ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ६ लाख ९९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी वाहनचालक राहुल हिरालाल मल्लेवार (वय २६, रा. गोरेगाव, जि. गोंदिया) याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, ई-साक्ष ॲपद्वारे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले. जप्त केलेला मुद्देमाल मूल पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही निगराणीत ठेवण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, चंद्रपूर यांना माहिती देण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाई पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे, पोलीस हवालदार पंकज बगडे आणि पोलीस हवालदार भास्कर कोचे यांनी यशस्वीरीत्या केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT