DJ 
चंद्रपूर

Chandrapur Mul DJ crackdown| मूलमध्ये ध्वनीमर्यादा ओलांडणाऱ्या डीजेंवर पोलिसांचा दणका

दरार दुर्गा मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत कारवाई; पाच वाहने व डीजे साहित्यासह ८५.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत ध्वनीची विहित मर्यादा ओलांडून पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन मंडळाने केले आहे. याप्रकरणी डीजे मालक, चालक आणि मंडळाच्या अध्यक्षाविरुद्ध मूल पोलिसांनी धडक कारवाई केली. २१ ऑक्टोबर रोजी शहरातील गांधी चौक परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पाच वाहनांसह डीजे साहित्य असा एकूण ८५ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ध्वनीप्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मूल पोलिसांनी विशेष गस्त व तपासणी मोहीम राबविली होती. यावेळी गांधी चौक परिसरातील दरार दुर्गा मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी डीजे वाहनांची तपासणी करण्यात आली. ध्वनीमापक यंत्राद्वारे केलेल्या मोजणीत काही डीजेच्या ध्वनीक्षेपकांचा आवाज विहित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी संबंधित डीजे चालक व मंडळाच्या आयोजकांना आवाजाची तीव्रता तातडीने कमी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. मात्र, या सूचनांचे पालन न केल्याने पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. या प्रकरणी दरार दुर्गा मंडळाचे अध्यक्ष संतोष प्रभाकर ठाकूरवार (वय ५१, रा. मूल), डीजे मालक व चालक अनिकेत रवी ननावरे (वय २२), अभिषेक चंद्रशेखर चिट्ठलोजवार (वय २२, रा. मूल), धीरज जुगलकिशोर घिचरे (वय ५१, रा. मानेवाडा, नागपूर) आणि लकी अनिल दुर्गे (वय १९, रा. बोरचांदली, ता. मूल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मूल पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३८ व १३६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान पाच वाहनांसह डीजे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. त्याची एकूण किंमत ८५ लाख २१ हजार रुपये असल्याचे माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT