Chandrapur Four Hotels License Suspended
चंद्रपूर : हॉटेलमधील अस्वच्छ स्वयंपाकघर, गंजलेले फ्रीज आणि शाकाहारी व मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी एकाच तंदूरचा वापर होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चंद्रपूर शहर आणि भद्रावती तालुक्यातील चार हॉटेल व नाष्टा सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. या चारही आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने या आठवड्यात अचानक तपासणी मोहीम राबविली. यावेळी अनेक हॉटेलमधील स्वच्छतेचा अभाव आणि अन्न हाताळणीतील निष्काळजीपणा समोर आला. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकणाऱ्या त्रुटी आढळल्याने प्रशासनाने संबंधित आस्थापनांविरोधात कठोर पावले उचलली.
कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये चंद्रपुरातील तुकुम येथील सुलतान ईफहाम बिर्यानी सेंटर, आझाद गार्डनसमोरील मौचक फॅमिली रेस्टॉरंट, मूल रोडवरील श्रीहरी नाष्टा सेंटर आणि भद्रावती तालुक्यातील भामडेळी येथील विर्य वाईल्डलाईफ टुर्स एलएलपी (रिसॉर्ट) यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १५ आस्थापनांचे परवाने व नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहेत. या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अन्न व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई सहायक आयुक्त प्रवीण उमप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी कुणाल मुळे, उमेश कापगते आणि प्रणय कांबळे यांच्या पथकाने तपासणी व कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली. ग्राहकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे, यासाठी प्रशासनाकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जात आहे.