MD Drugs Seized
चंद्रपूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात अंमली पदार्थाविरोधात चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रयतवारी कॉलरी परिसरात छापा टाकून एका विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन बालकाच्या ताब्यातून MD (M.D. Drugs) पावडर, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २,८४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला ३१ डिसेंबर रोजी रयतवारी कॉलरी परिसरात अवैध MD ड्रग्ज विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे LCB च्या पथकाने रयतवारी कॉलरी, चंद्रपूर परिसरात सापळा रचून छापा कारवाई केली.
या छाप्यात एका विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाच्या ताब्यातून ४८.१६० ग्रॅम वजनाची MD पावडर (अंदाजे किंमत २,४०,००० रु.), एक जुना वापरता मोबाईल (अंदाजे किंमत ५,००० रु.) तसेच ३९,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण २.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणात विधी संघर्ष बालकासह दोन फरार व पाहिजे आरोपी सैफुउद्दीन सिद्दीकी (रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपूर) आणि श्रीकांत डुंबरे (रा. वाठोडा, नागपूर) यांच्याविरोधात पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक ११०१/२०२५ अन्वये कलम ८(क), २२(ब), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पथकाने ही मोहीम राबविली.
या पथकामध्ये सहा. पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस हवालदार नितीन साळवे, नितीन कुरेकार, सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, प्रमोद कोटनाके, परवरिश शेख, पोलीस अंमलदार शशांक बादामवार, प्रसाद धुळगुंडे, प्रसाद धुळगुंडे यांचा समावेश होता.