Chandrapur kidney Racket | किडनी विक्री प्रकरणाचा तपास वेगात :  
चंद्रपूर

Chandrapur kidney Racket |रोशन कुळेसह आणखी पाच जणांनी विकली किडनी ; मानवी अवयव तस्करीचे जाळे देशभर पसरल्याचे उघड

नागभीड सावकारी प्रकरणातून धक्कादायक खुलासा : कंबोडियात मोठा किडनी रॅकेट स्कॅम सुरू असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील अवैध सावकारी प्रकरणातून उघडकीस आलेल्या किडनी विक्रीच्या घटनेने आता देशव्यापी मानवी अवयव तस्करीच्या रॅकेटकडे लक्ष वेधले आहे. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकणाऱ्या रोशन कुळे  प्रकरणात आता आणखी पाच जणांनी किडनी विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा तपास अधिक गंभीर व व्यापक होत चालला आहे.

नागभीड तालुक्यातील रोशन कुळे यांनी अवैध सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तपासात नवनवी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. चौकशीत असे उघड झाले आहे की, रोशन कुळे यांच्यासोबत राजस्थान, हरियाणा, पंजाब, बिहार आणि उत्तर प्रदेश येथील युवकांचा या किडनी विक्री प्रकरणात समावेश होता. हे सर्व युवक कंबोडियात जाण्यासाठी एकत्र निघाले होते.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, या गटात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक युवकही होता. मात्र कोलकाता विमानतळावर पोहोचल्यानंतर त्याचे मनपरिवर्तन झाले आणि त्याने तेथूनच माघार घेतली. कुळे व अन्य तिघे युवक पुढे कंबोडियात गेले, तर एकूण पाच जणांची तेथे किडनी काढण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या नव्या खुलाशामुळे मानवी अवयव तस्करीचे मोठे रॅकेट देशभर सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. गरीब, कर्जबाजारी व आर्थिक अडचणीत सापडलेल्या युवकांना हेरून त्यांना परदेशात नेऊन किडनी विक्रीस प्रवृत्त केले जात असल्याचा संशय अधिक बळावला आहे. नागभीड सावकारी प्रकरणातून सुरू झालेला हा तपास आता आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांकडून विशेष चौकशी पथक (एसआयटी) गठीत करण्यात आल्याची माहिती आहे. या पथकाकडून किडनी तस्करीच्या रॅकेटचे धागेदोरे, दलाल, डॉक्टर व परदेशातील संपर्क यांचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, रोशन कुळे यांनी माध्यमांसमोर बोलताना कंबोडियात किडनी रॅकेटचा मोठा स्कॅम सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून, येत्या काळात मानवी अवयव तस्करीच्या या रॅकेटचे मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT