चंद्रपूर : ग्रामीण महिलांना नोकरीचे आमिष दाखवून सव्वापाच लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागभीड तालुक्यात उघडकीस आला. या प्रकरणी नागभीड पोलिसांनी राजेंद्र विनोद मेश्राम (वय 39,रा. जामगाव बु., ता. वरोरा, जि. चंद्रपूर) याला गुरूवारी (दि.9) अटक केली असून आरोपीने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महिलांकडून अशा प्रकारे पैसे उकळल्याचे उघड झाले आहे.
7 ऑक्टोबर रोजी नागभीड पोलीस स्टेशनला कान्पा येथील भारती फुलचंद फाले (वय 34) यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपी राजेंद्र मेश्राम याने “स्वयंभु सनराईज ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर” या नावाने गावागावात *“माय इंडिया निधी बँक”*च्या शाखा स्थापन करण्याचे आश्वासन दिले. त्याने फिर्यादीला एरिया मॅनेजर पदावर नेमणूक देतो, असे सांगून तिचा व इतर महिलांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खोट्या ऑर्डर तयार करून त्या खऱ्या असल्याचा भास निर्माण करत महिलांकडून एकूण 5 लाख 30 हजाराची रक्कम उकळली. परंतू, काही दिवसांनी महिलांना फसवणुकीचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे नागभीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून तपास अधिकारी स.पो.नि. दिलीप पोटभरे यांनी पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. बुधवारी (दि.8) संशयित आरोपी राजेंद्र मेश्राम याला पोलिसांनी अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीवर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक मम्मुका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, तसेच पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दिलीप पोटभरे, पो.हवा. दीपक कोडापे आणि पो.अं. दिलीप चौधरी यांनी ही कारवाई करण्यात आली. आरोपी राजेंद्र मेश्राम याने अनेकांना फसवल्याची माहिती मिळत आहे. जिल्ह्यातील विविध भागांतील महिलांकडून पैसे उकळण्याच्या तक्रारी पुढे येत असून पोलिसांकडून त्याचा सखोल तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या बनावट संस्था, खोटी नोकरीची आश्वासने किंवा निधी बँकेच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणूक योजनांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.