मिरज : स्वस्त दरात औषध देण्याचे आमिष दाखवून मिरजेतील एका औषध दुकानदार महिलेची तब्बल 1 कोटी 43 लाख 31 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी हर्ष तोलाणी व अरुण कुमार या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा फसवणुकीचा दाखल झाला आहे.
विजयश्री सचिन उंडाळे यांचे ब्राह्मणपुरीत ‘श्री स्वस्त औषधी’ दुकान आहे. चार महिन्यापूर्वी उंडाळे यांच्या व्हॉटस् अॅपवर तोलानी व अरुणकुमार यांनी संपर्क साधून स्वस्त औषधे खरेदीसाठी एक ‘अॅप’ डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठविली. या अॅपवरून औषध खरेदी केल्यास अधिक नफा मिळेल, या आश्वासनावर उंडाळे यांनी मार्च ते जूनदरम्यान आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये मोठी रक्कम पाठवली. यानंतर आणखी पैसे न पाठविल्यास आधीची रक्कम बुडेल, अशी भीती दाखवून उंडाळे यांच्याकडून एकूण दीड कोटी उकळण्यात आले. आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर उंडाळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.