Chandrapur Breaking : डाळ-भाजीत पडली जिवंत पाल; जिवतीच्या आश्रमशाळेत ३० विद्यार्थ्यांना विषबाधा 
चंद्रपूर

Chandrapur Breaking : डाळ-भाजीत पडली जिवंत पाल; जिवतीच्या आश्रमशाळेत ३० विद्यार्थ्यांना विषबाधा

पालीचे तुकडे आढळल्यानंतर जेवण थांबवले, विद्यार्थ्यांवर राजुरा रुग्णालयात उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नगराळा येथील अमरु नाईक माध्यमिक आश्रमशाळेत डाळ-भाजीत पाल पडल्याने ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डाळ-भाजी शिजत असताना त्यात जिवंत पाल पडली. मात्र, स्वयंपाकी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला नसल्याचा आरोप आहे. जेवण वाढताना विद्यार्थिनींना डाळ-भाजीत पालीचे लहान-मोठे तुकडे आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जिवती तालुक्यातील नगराळा येथे अमरु नाईक माध्यमिक आश्रमशाळा असून, या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील सुमारे ५० विद्यार्थी निवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. निवासी विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या सुमारास डाळ-भाजी तयार करण्यात येत होती. त्याचवेळी डाळ-भाजीच्या भांड्यात जिवंत पाल पडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची माहिती झाली नसल्याचा आरोप आहे.

त्यानंतर सुमारे २९ विद्यार्थी जेवणासाठी बसले. विद्यार्थ्यांनी काही अन्न खाल्ले. मात्र, डाळ-भाजी वाढत असताना ती वाटप करणाऱ्या विद्यार्थिनींना त्यामध्ये पालीचे लहान-मोठे तुकडे आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच विद्यार्थ्यांना पुढील जेवण करण्यास मज्जाव करण्यात आला. दरम्यान, काही विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना तातडीने जिवती येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.

विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

सध्या उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलिसांकडून चौकशी सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांकडून उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच आश्रमशाळेच्या अधीक्षकांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. अन्न तपासणीच्या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

निवासी विद्यार्थी विविध गावांतील

आश्रमशाळेच्या निवासी विभागात राहणारे विद्यार्थी कुंभेझरी, पारधीगुडा, नागलोन, नोकेवाडी, पेदा, आकसापूर, नगराळा, शंकर लोधी, नागपाडा आदी गावांतील असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या घटनेची माहिती संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचताच पालकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

आश्रमशाळांच्या भोजन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेसह स्वच्छतेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वयंपाकघरात अन्न तयार करताना आवश्यक ती स्वच्छता आणि खबरदारी घेतली जाते का, अन्नाची नियमित तपासणी केली जाते का, तसेच विद्यार्थ्यांना भोजन देण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासली जाते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच जिवती तालुक्यातील आश्रमशाळेत अन्नातून विषबाधेची घटना घडल्याने आदिवासी आश्रमशाळांच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित आश्रमशाळेतील भोजन व्यवस्थेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT