Chandrapur illegal money lending
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात अवैध सावकारीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून आर्थिक गुन्हे शाखेने आठ सावकारांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व बेकायदेशीररित्या मालमत्ता बळकावण्याचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात अनेक शेतकरी व सामान्य नागरिक फसवले गेले असल्याची माहिती समोर आली असून आर्थिक गुन्हे शाखेने नागरिकांना पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
चंद्रपूर शहरातील आर्थिक गुन्हे शाखेने मोठ्या कारवाईत अवैध सावकारी करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. ऋषीराज सोमाणी, रोहीत सोमाणी, सुनिता राधेश्याम सोमाणी, राधिका सोमाणी, अजय हर्षदारय संघवी, प्रिती मनोज संघवी, स्तुती ऋषीराज सोमाणी आणि अशोक मुलजीभाई ठक्कर या सावकारांनी बेकायदेशीरपणे शेतजमिनी, घरे व अन्य मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे गु.रं.नं. 80/2025 अंतर्गत भादंवि कलम 420, 465, 467, 471, 474, 34, 120 (ब) तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अंतर्गत कलम 39 व 45 आणि नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 (क) अन्वये तसेच MPID कायदा 1999 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याशिवाय, आरोपी अशोक ठक्कर याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे अप.क्र. 218/2022 मध्ये कलम 420, 406, 467, 468 भा.दं.वि. व MPID कायद्यानुसार तर रामनगर पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. 685/2024 अंतर्गत नवीन BNS कायद्यानुसार (कलम 115(2), 3(5), 333, 351(2)) गुन्हे दाखल आहेत.
फसवणूक झालेल्या नागरिकांनी किंवा ज्यांच्या मालमत्तेवर बेकायदेशीररित्या कब्जा करण्यात आला आहे, अशांनी आपली लेखी तक्रार व सर्व कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे तात्काळ सादर करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.