chandrapur-weather-alert-heavy-rainfall-warning-from-july-6-to-8
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यासाठी 6 जुलै ते 8 जुलै 2025 या कालावधीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला आहे. यामुळे प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात येत्या 6 ते 8 जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने या कालासाठी ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अती जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या मार्गदर्शनाखाली खबरदारीचे उपाय जाहीर करण्यात आले असून नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
1) शक्य असल्यास घरातच सुरक्षित राहावे आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये.
2) मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या वेळी खिडक्या व दरवाज्यांपासून दूर राहा.
3) सखल भाग, अंडरपास, ड्रेनेजच्या खड्ड्यांपासून दूर राहा.
4) वाहन चालवणे टाळा, विशेषतः कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत.
5) विजेच्या तारांपासून व पॉवर लाईनपासून अंतर ठेवा.
6) मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीचा आसरा घ्या किंवा सखल भागात वाकून बसा.
7) घरात असताना विद्युत उपकरणे बंद करा, नळ, पाइपलाइन व विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका.
8) आकाशात विजा चमकत असल्यास लँडलाईन फोनचा वापर, अंघोळ किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे टाळा.
9) लोखंडी शेड, उंच झाडे, धातूचे मनोरे यांच्या जवळ आसरा घेणे टाळा.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले असून, नदी-नाल्यांना पूर आला असल्यास किंवा पूलावरून पाणी वाहत असल्यास ते ओलांडू नये. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.
ऑरेंज अलर्टमुळे संभाव्य धोका लक्षात घेता, प्रत्येक नागरिकाने सुरक्षितता आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.