Gunjewahi Tiger Attack Women Survivors Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack |किंकाळ्या ऐकल्या अन् आम्ही जीव मुठीत घेऊन पळालो; वाघ हल्ल्यातून बचावलेल्या तीन महिलांनी सांगितली थरारक आपबीती

तेंदूपत्ता तोडताना अचानक हल्ला; चार सहकारी महिलांना डोळ्यासमोर गमावल्याने गावावर शोककळा, भीती आणि संतापाचे सावट

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Gunjewahi Tiger Attack Women Survivors

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या वाघाच्या भीषण हल्ल्याने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या सात महिलांपैकी चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर जीव मुठीत घेऊन पळालेल्या तीन महिला कसाबसा बचावल्या. या तिन्ही महिलांनी कथन केलेला घटनाक्रम अंगावर काटा आणणारा असून, जंगलातील त्या भयावह क्षणांचे वर्णन करताना त्यांच्याही डोळ्यांत अश्रू दाटून आले.

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील 1836 क्रमांकाच्या कंपार्टमेंटमध्ये ही थरारक घटना घडली. मृत महिलांमध्ये कवडूबाई दादाजी मोहुर्ले (45), अनुबाई दादाजी मोहुर्ले (46), संगीता संतोष चौधरी (36) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (33) यांचा समावेश आहे.

“अचानक किंकाळ्या ऐकू आल्या...”

घटनेतून बचावलेल्या एका महिलेने सांगितले की, “आम्ही सातही महिला गेल्या आठवडाभरापासून रोज तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जात होतो. आजही सकाळी मिळूनच जंगलात गेलो. सुरुवातीला सगळ्या एकत्र होतो, पण ज्या ठिकाणी पानं कमी होती तिकडे पुढे जावे लागत होते. आमच्यापैकी तीन महिला पुढे होत्या आणि चार महिला काही अंतरावर मागे राहिल्या होत्या. अचानक जोरजोरात किंकाळ्या आणि आरडाओरडा ऐकू आला. आम्ही प्रचंड घाबरलो. काय झाले हे समजत नव्हते.”

ती पुढे म्हणाली, “आम्हाला काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव झाली. आम्ही घाबरून रस्त्याच्या दिशेने धाव घेतली. रस्त्यावर काही वाहने दिसली. हातपाय थरथरत होते, बोलताही येत नव्हते. चेहऱ्यावर घाम आणि भीती होती. तरीही आम्ही वाहन चालकांना सांगितले की, आमच्या चार महिला मागे राहिल्या आहेत आणि जोरात ओरडण्याचा आवाज येत होता.”

“दोन महिलांनी प्रतिसाद दिला... मग सगळं शांत झालं”

दुसऱ्या महिलेने डोळ्यात पाणी आणत सांगितले, “आम्ही सातही जणी मिळून पान तोडत होतो. पण दाट झुडपं आणि पानांच्या ठिकाणामुळे आम्ही मागेपुढे झालो. मागे राहिलेल्या महिलांना बहुतेक वाघ दिसला असावा. त्या जोरात ओरडू लागल्या. आम्हाला संकटाची चाहूल लागली. आम्ही त्यांना हाका मारल्या. दोन महिलांनी आवाज दिला, पण दोघींनी प्रतिसाद दिला नाही. काही वेळाने पुन्हा जोरात किंकाळ्या आल्या... आणि मग अचानक सगळं शांत झालं.”

“काट्याकुट्यातून जीव वाचवत पळालो”

तिसरी महिला म्हणाली, “आम्ही काट्याकुट्यातून, झुडपातून जीव मुठीत घेऊन पळत होतो. घटनास्थळापासून दूर जाऊन रस्त्यावर आलो. काही वाहन चालकांना सगळा प्रकार सांगितला. त्यांनीही वाघाच्या हल्ल्याचा संशय व्यक्त केला आणि तातडीने गावात माहिती दिली. लगेच गावकरी काठ्या घेऊन जंगलाकडे धावले. वन विभागाचे अधिकारी आले. शोधमोहीम सुरू झाली आणि काही अंतरावर चारही महिलांचे मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले.”

या महिलांनी सांगितले की, मृतांपैकी एका महिलेच्या दोन लहान मुली आहेत. तर उर्वरित तिन्ही महिला देखील आपल्या कुटुंबाचा आधार होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे अनेक कुटुंबांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे.

“पोटासाठी जंगलात जावे लागते...”

घटनेनंतर गावातील महिलांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण आहे. गावातील एका महिलेने सांगितले, “या परिसरात वाघाची प्रचंड दहशत आहे. पण पोटासाठी आम्हाला जीव मुठीत घेऊन जंगलात जावे लागते. गावात रोजगार नाही. तेंदूपत्ता तोडायला गेलो नाही तर उपाशी राहावे लागते. संसारासाठी प्रत्येक वस्तू विकत घ्यावी लागते. बाजार महागला आहे. आज चार महिला पोटासाठी जंगलात गेल्या आणि जीव गमावून बसल्या.”

महिलांनी वन विभागावरही नाराजी व्यक्त करत सांगितले की, “वाघांचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. पण वन विभागाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. संघर्ष वाढत चालल्याने आता जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे.”

“नागरिक आता कायदा हातात घेतील”

गावातील पुरुष मंडळींनीही प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. “एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना ठार मारण्याची ही दुसरी घटना आहे. तरीही वन विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तालुक्यात उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे लोकांना मोहफूल आणि तेंदूपत्ता यावरच अवलंबून राहावे लागते,” असे ग्रामस्थांनी सांगितले.

वनमंत्र्यांवरही टीका करत काही ग्रामस्थ म्हणाले, “वारंवार मागण्या करूनही शासन दखल घेत नाही. अशा घटना थांबल्या नाहीत तर नागरिक स्वतःचे रक्षण करण्यासाठी कायदा हातात घेतील.”

गुंजेवाहीतील या भीषण घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून, जंगलालगतच्या गावांमध्ये आता प्रत्येक दिवस दहशतीत जात आहे. वन विभाग आणि शासन या घटनेनंतर नेमकी कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT