ट्रक चालक व मालकाविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला  Pudahri
चंद्रपूर

Chandrapur Crime | गडचांदूर पोलिसांची मोठी कारवाई; 35 गोवंशीय जनावरे तस्करांच्या तावडीतून मुक्त

22 लाखांचा मुद्देमाल जप्त, चालक व मालकाविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Gadchandur Cattle Rescue

गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर पोलिसांनी गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 35 गोवंशीय जनावरे तस्करांच्या तावडीतून मुक्त केली. सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, या कारवाईत 22 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रक चालक व मालकाविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भोयगाव परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. 6 ऑगस्ट रोजी पहाटे टाटा कंपनीचा 12 चाकी ट्रक (एमएच-27-एएक्स-8886) अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने तेलंगणाच्या दिशेने पलायन केले.

यानंतर गडचांदूर पोलिसांनी ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. काही अंतरावर कोरपना तालुक्यातील परसोडा फाटा परिसरात चालकाने ट्रक रस्त्यावर सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून ठेवलेली 35 गोवंशीय जनावरे आढळून आली.

या कारवाईत 7 लाख रुपये किमतीची गोवंशीय जनावरे, 15 लाख रुपयांचा ट्रक आणि 1 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 22 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील संगोपनासाठी 'प्यार फाउंडेशन', चंद्रपूर येथे सुपूर्द करण्यात आले आहे.

या प्रकरणी गडचांदूर पोलिसांनी प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार ट्रक चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, फरार चालकाचा शोध घेण्यासह पुढील तपास सुरू आहे.  ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT