ईव्हीएम मशीन फोडल्यानंतर केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली (Pudhari Photo)
चंद्रपूर

Chandrapur EVM Breaks| चंद्रपूरमध्ये तणाव : ‘नगारा’ चिन्ह दाबताच ‘कमळ’समोरील दिवा लागला; रागाच्या भरात मतदाराने ईव्हीएम फोडले

Gadchandur Municipal Election | गडचांदूर प्रभाग ९ मध्ये पोलिसांनी मतदान केंद्रावर सुरक्षा वाढवली

पुढारी वृत्तसेवा

Gadchandur Voter breaks EVM

चंद्रपूर : गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मंगळवारी (दि.२) प्रभाग क्रमांक ९ मधील आदर्श हिंदी विद्यालय (केंद्र क्रमांक २) येथे ईव्हीएम मशीनवरून मोठा वाद निर्माण झाला. सायंकाळी मतदानाला आलेल्या राम मल्लेश दुर्गे (वय ४०) या मतदाराने ‘नगारा’ चिन्हाचे बटन दाबताच अचानक बाजूला असलेल्या भाजपच्या ‘कमळ’ चिन्हाचा दिवा लागल्याचा गंभीर आरोप करत संतापाच्या भरात ईव्हीएम मशीन फोडून टाकले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

मतदाराचा आरोप आणि मशीन फोडल्याची घटना समजताच केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. संतप्त नागरिकांनी “भाजप मुर्दाबाद”च्या घोषणा देत आंदोलनाचा पवित्रा घेतला.  परिणामी काही वेळ मतदान प्रक्रियेलाच ब्रेक बसला आणि वातावरण तणावपूर्ण बनले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, गडचांदूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनही या  केंद्रावर तणावपूर्ण स्थिती आहे.

पोलिसांनी तत्काळ पंचनामा प्रक्रिया सुरू केली असून ईव्हीएम मशीन जप्त करण्यात आले आहे. मतदान पुन्हा सुरळीत करण्यात आले असून या घटनेबाबत पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणामुळे प्रभाग ९ मधील राजकीय वातावरण तापले असून मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. केंद्राबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी यासाठी प्रशासन सतर्क आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT