Chandrapur Fake Loan Approval Scam
चंद्रपूर : फायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवून बनावट कर्ज मंजुरी पत्राद्वारे लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा चंद्रपूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बाबुपेठ येथील हार्वेस्टर मशीन विक्रेत्याची सुमारे ४.४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथून आरोपीला अटक करण्यात आली असून देशातील विविध राज्यांमध्येही त्याने अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
चंद्रपूर बाबुपेठ येथील तक्रारदार हे हार्वेस्टर मशीन विक्रेते असून त्यांच्या ग्राहकांना हार्वेस्टर खरेदीसाठी कर्जाची आवश्यकता होती. ग्राहकांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क हेमंत जोशी नावाच्या व्यक्तीशी झाला. त्याने स्वतःला पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड, नागपूरचा कर्मचारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपीने संबंधित ग्राहकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेत कर्जासंदर्भातील बनावट करारपत्रे तयार केली. त्यानंतर तक्रारदाराच्या व्हॉट्सअॅपवर बनावट ‘लोन सॅंक्शन लेटर’ पाठवून १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे दाखविण्यात आले.
कर्ज वितरणासाठी डाऊन पेमेंटच्या नावाखाली ४ लाख ४६ हजार २५० रुपये ‘वृषभ ईखार, जनरल मॅनेजर, पुनावाला फिनकॉर्प’ या नावाच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आले. तक्रारदारांनी १६ मे २०२६ रोजी आयएमपीएसद्वारे ही रक्कम संबंधित खात्यावर वर्ग केली. त्यानंतर आरोपीने कर्ज वितरण आणि मशीन डिलिव्हरीबाबत खोटी कागदपत्रेही पाठविली. मात्र, १९ मेपासून आरोपीचा मोबाईल क्रमांक बंद येऊ लागल्याने संशय निर्माण झाला.
तक्रारदारांनी नागपूर येथील पुनावाला फिनकॉर्प कार्यालयात चौकशी केली असता ‘हेमंत जोशी’ नावाचा कोणताही कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यावर त्यांनी सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदवून चंद्रपूर शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी शहर पोलिसांनी आयटी अॅक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सायबर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सायबर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपी विनोद शांताराम गडाख पाटील (वय ४४) याचा शोध घेऊन पुणे येथील राहत्या घरातून अटक केली.
प्राथमिक तपासात आरोपीने नाशिक, लखनऊ, इंदोर आणि वडोदरा या शहरांमध्येही विविध बनावट नावांचा वापर करून लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीविरुद्ध तपासादरम्यान आणखी काही कलमे वाढविण्यात आली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींच्या फोन किंवा व्हॉट्सअॅपवरील कर्ज मंजुरीच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.