Drought Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Drought News : चंद्रपूरला दुष्काळाची झळ; जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये 'Trigger-1' लागू, मिळणार 'या' सवलती!

राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून विविध उपाययोजना व सवलती लागू

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Drought Affected Talukas

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगाम 2026 मधील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांमुळे प्रभावित राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने ‘Trigger-१ (प्रथम कळ)’ लागू करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांचा समावेश आहे. या भागांसाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळी परिस्थितीचे ‘Trigger-१’ लागू

दुष्काळ व्यवस्थापन संहिता-2016 नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी शासनाने सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली आहे. खरीप 2026 मधील परिस्थितीच्या आधारे जूनपासून आतापर्यंतच्या पर्जन्याची तूट व अन्य घटकांचा विचार करून कृषी आयुक्तांनी शासनाला अहवाल सादर केला. या अहवालानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीचे ‘Trigger-१’ लागू असल्याचे निदर्शनास आले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही आणि पोंभुर्णा या 12 तालुक्यांचा समावेश आहे.

पिकांच्या स्थितीचा अहवाल शासनाला सादर होणार

‘Trigger-१’ लागू असलेल्या तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांच्या पंचनाम्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. सर्वेक्षण करण्यात आलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा सविस्तर अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनास तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुष्काळग्रस्त भागासाठी 12 प्रमुख उपाययोजना व सवलती कोणत्‍या?

‘Trigger-१’ लागू असलेल्या 265 तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेष बाब म्हणून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती या महत्त्वाच्या सवलतींचा समावेश आहे. तसेच कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट देण्यात येणार आहे. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीजपंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असल्याने त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या वीजपंपांना ही सूट लागू राहणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषांत शिथिलता

ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषांत शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टंचाई जाहीर करण्यात आलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही.

अन्नधान्य, चारा व पाण्याच्या उपलब्धतेवर भर

दुष्काळी परिस्थितीचा शेतकरी व शेतमजुरांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ नये यासाठी शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी, शेतमजूर व इतर घटकांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही, यासाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यात येणार आहे. जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध करून देण्यासोबतच जलसंधारणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय शासनाने यापूर्वी निर्गमित केलेल्या निर्देशांनुसार नागरिकांसाठी पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी आवश्यक पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील समाविष्ट 12 तालुक्यांमध्ये शासन निर्णयानुसार पंचनामे व पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असून, शासनाने निश्चित केलेल्या उपाययोजना व सवलतींची अंमलबजावणी संबंधित यंत्रणांमार्फत करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT