राजुरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने आरोपीला तेलंगणा राज्यातून अटक केली  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Crime | धोपटाळा कॉलनीतील महिलेच्या खून प्रकरणाचा छडा; तेलंगणातून आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा व राजुरा पोलिसांची संयुक्त धडाकेबाज कारवाई; सायबर तपासाच्या मदतीने आरोपीला अटक

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Dhoptala Colony Crime

चंद्रपूर : राजुरा येथील धोपटाळा कॉलनी येथे विवाहित महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याच्या खळबळजनक प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूर आणि राजुरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने आरोपीला तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९ मे २०२६ रोजी रणधीर राजू कुंभारे (वय ३७) रा. महाकाली कॉलनी, कपिल चौक, चंद्रपूर) यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, त्यांची पत्नी शितल कुंभारे या धोपटाळा येथील माहेरी असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास शेजाऱ्यांनी फोन करून त्या रक्ताच्या उलट्या करून बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती दिली.

याची माहिती मिळताच रणधीर कुंभारे तातडीने धोपटाळा येथे पोहोचले. घराच्या पाठीमागील देव्हाऱ्याच्या खोलीत शितल कुंभारे या खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून निर्घृणपणे खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.

या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) व ३३२ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. पथकाने घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करत तांत्रिक तपास, गोपनीय माहिती संकलन आणि सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा माग काढला.

तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले आणि त्यांच्या पथकाने तेलंगणा राज्यातील मंचीरियाल जिल्ह्यातील रेपनपल्ली येथे धाड टाकून संशयित आरोपी राजेश व्यंकटी अट्टेटेला (वय ३५) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी राजुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, राजुरा पोलीस ठाणे आणि सायबर सेलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वय साधत उल्लेखनीय कामगिरी बजावली. अवघ्या २४ तासांत खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा उलगडा झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT