Chandrapur news  
चंद्रपूर

Chandrapur chivda food poisoning | चिवड्यात मेलेली पाल, 7 जणांना विषबाधा; दुकान सील; खाद्य परवाना निलंबित

Chandrapur chivda food poisoning - अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर - वरोरा शहरातील एसटी बसस्थानकाजवळील चिवडा दुकानातून कच्चा चिवडा खाल्ल्यानंतर सात नागरिकांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या नागरिकांना देण्यात आलेल्या चिवड्यामध्ये मेलेली पाल आढळून आल्याचे समोर आले. घटनेची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने संबंधित दुकान सील करून खाद्य परवाना निलंबित केला आहे.

वरोरा शहरातील ट्रॉमा केअर सेंटरला लागून असलेल्या मनोज चिवडा सेंटरमध्ये हा प्रकार घडला. कच्चा चिवडा मिळत असल्याने या दुकानात ग्राहकांची गर्दी असते. सोमवारी दुपारच्या सुमारास सात ग्राहकांनी दुकानातून कच्चा चिवडा खाल्ला. त्यानंतर काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ग्राहकांना देण्यात आलेल्या चिवड्यामध्ये मृत पाल आढळून आल्याचे समोर आले.

ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारानंतर सातही रुग्णांची प्रकृती स्थिर झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रवीण उमक यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित दुकानाचा खाद्य परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिस प्रशासनाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेनंतर वरोरा शहरात उघड्यावर तसेच अस्वच्छ परिस्थितीत विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांची अन्न व औषध प्रशासनाने नियमित तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT