Kolkata Cyber Criminal Arrested
चंद्रपूर : एटीएममधून पैसे काढताना कमी रक्कम मिळाल्याची तक्रार करणाऱ्या महिलेला पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने ५ लाख ४३ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय सायबर भामट्याला चंद्रपूर सायबर पोलिसांनी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून अटक केली आहे. बँक कर्मचारी असल्याचे भासवून व्हॉट्सअॅपवर बनावट APK फाईल पाठवत बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून त्याने ही फसवणूक केली होती. अंगद सुरज प्रजापती (वय २१) रा. कोलकाता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ५८ वर्षीय शालेय मुख्याध्यापिकेने ३० ऑगस्ट २०२६ रोजी अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून पाच हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्या हातात प्रत्यक्षात ९०० रुपये कमी आले. याबाबत त्यांनी बँकेत रीतसर तक्रार नोंदवली होती. याच संधीचा फायदा घेत एका अनोळखी व्यक्तीने त्यांना मोबाईलवर संपर्क साधला. आपण बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगत संबंधित व्यक्तीने एटीएममधून ९०० रुपये कमी आले आहेत का, अशी विचारणा केली. त्यामुळे फिर्यादीचा त्याच्यावर विश्वास बसला.
त्यानंतर आरोपीने व्हॉट्सअॅपवर एक बनावट APK फाईल पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगितले. या अॅपमध्ये एटीएम पिन आणि सीव्हीव्ही क्रमांक भरण्यास सांगून आरोपीने बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर विविध ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून खात्यातील तब्बल ५ लाख ४३ हजार रुपये परस्पर वळवून घेतले. याप्रकरणी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ००६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), ६१(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सायबर पोलिसांचे विशेष पथक पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे रवाना केले. सपोनि निलेश गिरी, पोलीस अंमलदार राहुल पोंदे, अनिमेश भोंगळे आणि पंकज बावणे यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग चार दिवस अहोरात्र शोधमोहीम राबवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी अंगद सुरज प्रजापती याचा शोध घेण्यात आला. अखेर उल्टाडांगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
आरोपीला चंद्रपूर येथे आणल्यानंतर न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली. या कालावधीत त्याची सखोल चौकशी करण्यात आली. या फसवणुकीत सहभागी असलेले इतर साथीदार तसेच सायबर गुन्ह्याचे संपूर्ण नेटवर्क शोधण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. ७ नोव्हेंबर रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्याची चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. विशेष पथकासह सपोनि राजेंद्र सोनवणे, सपोनि अनिसा सय्यद, सपोउपनि मुजावर अली तसेच कार्तिक खनके, उमेश रोडे, गुणवंत मुंडके, साहिल आवारी, छाया शंभरकर, पूजा जांभुळे, अंजली घिवे आणि श्रुतीका घाईत यांनी तपासात सहकार्य केले.
बँकेचे अधिकारी किंवा कर्मचारी कधीही फोनवरून एटीएम पिन, ओटीपी अथवा सीव्हीव्ही क्रमांकासारखी गोपनीय माहिती मागत नाहीत. अनोळखी व्यक्तींनी व्हॉट्सअॅप किंवा संदेशाद्वारे पाठविलेल्या APK फाईल डाउनलोड करू नयेत. कोणत्याही परिस्थितीत बँक खात्याची गोपनीय माहिती शेअर करू नये. ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन चंद्रपूर सायबर पोलिसांनी केले आहे.