चंद्रपूर : वरोरा पोलिसांनी अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या आणि वाहतूक होत असलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूवर मोठी कारवाई केली. दोन दिवसांत दोन स्वतंत्र रेड करून एकूण 23.89 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस व अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त पथकाने केली.
दि. 03 डिसेंबर 2025 रोजी वरोरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजा एकअर्जुना येथे मोठी कारवाई करण्यात आली. आरोपी मिथुन लहानु घोटेकर (वय 42) रा. पंचशील चौक, जटपुरा गेट, चंद्रपूर यांच्या पिकअप वाहनातून तसेच त्याचे साथीदार व पळून गेलेला आरोपी अनिल बोधे, रा. वरोरा यांच्या रूममधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
कारवाईदरम्यान प्रतिबंधित सुगंधित तंबाखू (किंमत 12,40,260), अवैध वाहतुकीसाठी वापरलेले अशोक लेलॅन्ड मालवाहू वाहन (MH 34 BG 1009) — किंमत 5,00,000 एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹l17,40,260 जप्त करण्यात आले.या प्रकरणी पो. स्टे. वरोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरोरा पोलिस व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आरोपी अनिल फुलचंद शर्मा, रा. राममंदिर वार्ड, वरोरा यांनी शहरातील विविध ठिकाणी साठवून ठेवलेल्या सुगंधित प्रतिबंधित तंबाखू व पानमसाल्यावर कारवाई करण्यात आली. आरोपीकडून . प्रतिबंधित तंबाखू व पान मसाला किंमत 6,49,170 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पो. स्टे. वरोरा येथे दाखल झाला. दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल (वरोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, सपोनि सुनील पाटील तसेच कर्मचारी दिलीप सुर, महेश गावतुरे, मनोज ठाकरे, सौरभ कुलते, प्रशांत नागोसे, किशोर बोडे, अमोल नवघरे, सुखराज यादव, विशाल राजुरकर, संदीप मुळे यांनी केली. वरोरा पोलिसांच्या या सलग दोन मोठ्या कारवायांमुळे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.