

Chandrapur illegal sand transport
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गौण खनिज (रेती) उपसा व वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूरने गुरुवारी (दि.४) मोठी कारवाई केली. तीन ट्रॅक्टरसह तब्बल 15.15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. राजुरा पोलिस स्टेशन हद्दीत रचलेल्या सापळ्यात ही कारवाई करण्यात आली. तीन आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरला अवैधरित्या गौण खनिज (रेती)ची चोरीछुपे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचण्यात आला. दरम्यान, अवैध रेती वाहतूक करत असलेल्या तीन ट्रॅक्टर-ट्रॉलीला रोखण्यात पथकाला यश आले.
आरोपी राजेश्वर श्रीधर मालेकर, शुभम नामदेव मुसळे, सचिन भिमराव मडावी (तिघेही रा. आर्वी, ता. राजुरा गुरा) अवैध वाहतुकीसाठी वापरलेले तीन ट्रॅक्टर-ट्रॉली किंमत अंदाजे 15,00,000, तसेच एकूण ३ ब्रास रेती किंमत 15,000 अशा एकूण 15,15,000 किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ५९८/२०२५ नोंदविण्यात आला आहे. संबंधितांवर कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता–२०२३, सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, तसेच कलम १७७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.