Pratibha Dhanorkar Vijay Wadettiwar Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Congress | चंद्रपूर काँग्रेसमध्ये पुन्हा वादाचे वादळ: गटनेता पदावरून संघर्ष

Chandrapur Municipal Corporation Group Leader | वडेट्टीवार–धानोरकर मतभेद कायम; प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीनंतरही तोडगा नाही

पुढारी वृत्तसेवा

Vijay Wadettiwar vs Pratibha Dhanorkar

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत असलेल्या काँग्रेस पक्षात गटनेता पदावरून पुन्हा एकदा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. गटनेता पदावर आपल्याच समर्थकाची नियुक्ती व्हावी, यासाठी आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर आग्रही असल्याने आज होणारी गट स्थापना रखडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या वादामुळे काँग्रेसमधील सत्ता स्थापनेचा पेच पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गट स्थापनेचा आजचा मुहूर्त ऐनवेळी टळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गटनेता पदावरून सुरू असलेला वडेट्टीवार–धानोरकर यांच्यातील मतभेद अद्यापही मिटले नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. गटनेता पदावर आपल्याच गटातील व्यक्तीची नियुक्ती व्हावी, यासाठी दोन्ही नेते ठाम भूमिका घेत असल्याने पक्षांतर्गत तणाव वाढला आहे.

हा वाद शमवण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आज नागपुरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत तडजोडीचा मार्ग निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बैठकीनंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. उलट, आमदार विजय वडेट्टीवार यांनी थेट गटनेता पदाची मागणी केल्याने गट स्थापनेच्या प्रक्रियेला ब्रेक लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विशेष म्हणजे, आज सकाळीच आमदार वडेट्टीवार यांनी सायंकाळपर्यंत काँग्रेस गट स्थापन होऊन महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, अशी माहिती दिली होती. मात्र प्रत्यक्षात गट स्थापन होऊ शकलेला नसल्याने काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले आहेत.

या सगळ्या घडामोडींमुळे चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस सत्ता स्थापन करू शकणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे विरोधी पक्ष या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस नेतृत्व या वादावर नेमका काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काँग्रेस गटाची औपचारिक घोषणा आणि महापौर पदाच्या उमेदवारीबाबत अजूनही अनिश्चितता कायम असून, पुढील काही तासांत पक्ष नेतृत्वाकडून ठोस निर्णय अपेक्षित आहे. मात्र सध्या तरी गटनेता पदावरून निर्माण झालेला तणाव काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT