Chandrapur Maharajaswa Abhiyan Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Collector Vasumana Pant | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान राबविण्यात येत आहे

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Maharajaswa Abhiyan

चंद्रपूर : नागरिकांना महसूल विभागाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय, चंद्रपूर तसेच भुमी अभिलेख विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 10) पडोली येथे घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख प्रदीप जगताप, प्रभारी तहसीलदार ओंकार ठाकरे यांच्यासह नामदेव डाहुले, गंगाधर वैद्य, शेखर शेट्टी आदी उपस्थित होते.

महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडविण्यासाठी महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, या शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व सेवा देण्यात येत आहे. यात उत्पन्नाचे दाखले, शिधापत्रिका वाटप, सनद वाटप, सातबारा, फेरफार आदी लाभांचा समावेश आहे. नागरिकांना आता सरळ, सोप्या आणि ऑनलाईन पध्दतीनेसुध्‍दा लाभ घेण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. येथे शासकीय यंत्रणा उपस्थित आहे. त्यामुळे प्रत्येकाने विविध शासकीय स्टॉलला भेट देऊन आपल्याला त्याचा लाभ कसा मिळेल, याची माहिती जाणून घ्यावी, असे आावाहन त्यांनी केले.

महसूल विभागाशी नागरिकांचा सर्वाधिक संबंध : आमदार किशोर जोरगेवार

महसूल विभाग हा नागरिकांशी सर्वाधिक संबंध येणारा विभाग आहे. जनतेला एकाच ठिकाणी लाभ देण्यात येत असून यात सनद वाटप, विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून महसूल विभागाच्या अनेक महत्वपूर्ण निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यात नरेंद्र जोगी, बुध्ददास चांदेकर, भारत निखाडे, रामचंद्र निखाडे, सुरेश घोरुडे, उत्तम उपरे, विवेक मेश्राम यांना सातबारा आणि फेरफार प्रमाणपत्र, भुषण झाडे, भगवान झाडे, संगिता अहीर यांना जिवंत सातबारा प्रमाणपत्र तर छोटूखन पठाण, अशोक काळे, धर्माजी खिल्लारे, साईनाथ गोसावी, सुमन पिंगे यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT