चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रहमत नगर भागातील महानगरपालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्रावर (stp plant) क्लोरीन गॅस लीक झाल्याची घटना आज बुधवारी घडली. फायर कंट्रोल रूमच्या माहितीनुसार, अग्निशमन यंत्रनेणे घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सुमारे ६० ते ७० घरांतील नागरिकांना तात्पुरते किडवाई शाळा आणि इतर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहरात रहमतनगर भागात चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे 25 kld सांडपाणी शुद्धीकरण केंद्र आहे. याच सांडपाणी शुद्धीकरण केंद्रावर आज दुबुधवारी क्लोरीन गॅस लीक झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी सुरू झाली. बऱ्याच नागरिकांना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच फायर कंट्रोल रूममार्फत अग्निशमन विभागाला सतर्क करण्यात आले आणि त्वरित पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस लीक होण्याचा प्रकार अल्पकाळासाठी होता आणि त्यावर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात आले. कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा गंभीर जखमी होण्याची घटना घडलेली नाही. खबरदारी म्हणून रहमत नगर भागातील सुमारे ६० ते ७० घरांतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. हे नागरिक किडवाई शाळा तसेच इतर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, गॅस लीक नियंत्रित असून पुढील तपास सुरू आहे. महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी देखील स्थळावर पाहणी केली असून गळती कशी झाली याचा सखोल तपास केला जात आहे. यावेळी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतु प्रशासनाने वेळेवर योग्य पावले उचलल्यामुळे मोठा अनर्थ टळला. क्लोरीन गॅसचा वापर सांडपाणी पाणी शुद्धीकरणासाठी होत असल्याने त्याची हाताळणी अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. प्रशासनाने संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत आणि पुढील काळात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्न पूर्णपणे हाताळण्यात आला आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आणि नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.