

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काही भागांत मुसळधार तर काही भागांत अत्यल्प पाऊस नोंदवला गेला आहे. विशेषतः वरोरा आणि भद्रावती या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून वरोरा येथे ७७ मिमी आणि भद्रावती येथे ६७.१ मिमी इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे या परिसरातील नदी-नाले फुगून पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत.
चंद्रपूर व मुल तालुक्यांतही अनुक्रमे ४२.२ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा जास्त आहे. वरोरा येथे नेहमीच्या प्रमाणाच्या तब्बल ३५० टक्के आणि भद्रावतीत ३०९ टक्के इतका जास्त पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. याउलट जिवती व गोंडपिंपरी येथे पावसाने फारसा प्रतिसाद दिला नाही. जिवती येथे केवळ ७.५ मिमी आणि गोंडपिंपरी येथे ९.३ मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे.
जून ते सप्टेंबर या हंगामात जिल्ह्यात एकूण १०८४ मिमी पाऊस झाला आहे. तो सरासरीपेक्षा थोडा अधिक म्हणजे १०२ टक्के आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे. मागील वर्षी १२१९ मिमी पाऊस झाला होता. दरम्यान, जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा आणि इरई नद्यांना पूर आल्याने आणि छोट्या नाल्याही फुगल्याने काही ग्रामीण मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.