चिमूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी दीपक गोवर्धन मून यांना मारहाण प्रकरणी कर्मचाऱ्यांचा निषेध  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | चिमूर तहसील कार्यालयात मंडळ अधिकाऱ्याला मारहाण; पटवारी संघाचा कामबंदचा इशारा

आरोपीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Chimur Tehsil Office Assault Case

चंद्रपूर : शासकीय कामकाज सुरू असताना तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी दीपक गोवर्धन मून यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप विदर्भ पटवारी संघाच्या चिमूर उपविभाग शाखेने केला आहे. आरोपीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

बुधवारी (दि. १५) दुपारी तहसील कार्यालयात कामकाज सुरू असताना नागपूर येथील सुरेश वामन मेश्राम हे कार्यालयात आले. त्यांनी मंडळ अधिकारी दीपक मून यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर कॉलर पकडून मारहाण केली. तसेच डोके भिंतीवर आपटल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेत मून यांच्या हाताला दुखापत झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

आरोपीला अटक न झाल्यास १६ जुलैपासून काळी फीत लावून निषेध नोंदविण्यात येईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास २३ जुलैपासून सामूहिक रजा आंदोलन व कामबंदचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

मंडळ अधिकारी दीपक मून यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यावर कर्तव्य बजावत असताना झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल पोलिस प्रशासनाने घेतली आहे. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून त्याला रात्री अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT