Cash Seized Chandrapur Burglary Case
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरातील कार्यालयातून 6 लाखांची रोकड चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने छत्तीसगड राज्यातून अटक करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरीतील 3 लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून उर्वरित रकमेचा शोध पोलीस घेत आहेत.
चंद्रपूर शहरातील डी.एस.के. ग्रीन कॉलनी, दाताळा येथील रहिवासी सौ. राकेश अवघडे (वय 44) यांनी त्यांच्या बसस्थानकाजवळील पॅलेस हॉटेलच्या मागे असलेल्या कार्यालयातून अज्ञात चोरट्याने 6 लाखांची रोकड चोरी केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.
या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पथकाने संशयित आरोपी वलेश कुमार हल्बा उर्फ बुवारिया (वय 38, रा. रेंगाकठेरा, पोस्ट डोंगरगाव, जिल्हा राजनांदगाव (छत्तीसगड) याचा शोध घेत त्याला छत्तीसगडमधून ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीजबाबाच्या आधारे पंचांसमक्ष चोरीतील 3 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. चौकशीत आरोपीने 27 जुलैरोजी चंद्रपूर बसस्थानक परिसरातील एका कार्यालयातून 6 लाखांची रोकड चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी चोरीतील निम्मी रक्कम हस्तगत केली असून उर्वरित 3 लाखांच्या शोधासाठी तपास सुरू आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकर, पोहवा सतीश आवठारे, पोहवा इम्रान खान, पोहवा लालू यादव, पोहवा संदीप, पोहवा हिरालाल गुप्ता, पोअं. किशोर वाकडे आणि पोअं. शशांक बदाम यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.