Chandrapur Bhadrawati Drug Bust
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत नागपूर येथील एका तस्कराला अटक केली आहे. भद्रावती येथे विक्रीसाठी आणण्यात आलेले १६८.९४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण १४ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, नागपूर येथील अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार (वय ४०) हा आपल्या पांढऱ्या रंगाच्या होंडा अॅमेझ (एमएच-४९-एफ-१५६९) कारमधून मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन ड्रग्ज घेऊन भद्रावती येथे विक्रीसाठी येणार आहे.
माहितीची खातरजमा झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने नागपूर-भद्रावती मार्गावरील जमघट हॉटेलसमोर सापळा रचला. ३ जून रोजी पहाटे सुमारे १२.३५ वाजताच्या सुमारास संशयित वाहन दिसताच पोलिसांनी नाकाबंदी करून कार थांबवली.
वाहनाची आणि चालकाची कायदेशीर झडती घेतली असता आरोपी अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार याच्या ताब्यातून ८ लाख ५० हजार रुपये किमतीचे १६८.९४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज आढळून आले. तसेच अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली होंडा अॅमेझ कारही जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १४ लाख ११ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २२ (क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इमरान खान, हिरालाल गुप्ता तसेच पोलीस अंमलदार किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.