Chandrapur leopard : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; भद्रावती परिसरातील ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा श्वास

Chandrapur leopard : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; भद्रावती परिसरातील ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा श्वास
Published on
Updated on

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतीचे वातावरण निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पाळीव जनावरांवर सातत्याने हल्ले करून भक्ष्य करणाऱ्या या बिबट्याला मंगळवारी (दि. २ जून) पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास घोट परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात पकडण्यात वन विभागाला यश आले. या कारवाईमुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मागील काही दिवसांपासून भद्रावती तालुक्यातील घोटनिंबाळा, लोणारा पारखी, चालबर्डी, कचराला, रामटेक सोसायटी, देऊरवाडा तसेच आसपासच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला होता. रात्रीच्या वेळी हा बिबट्या शेतशिवारात आणि गावालगतच्या भागात फिरत असल्याचे वारंवार निदर्शनास येत होते. विशेष म्हणजे पाळीव जनावरे, शेळ्या, कुत्री व इतर प्राण्यांवर हल्ले करून त्यांना भक्ष्य बनविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बिबट्याच्या वाढत्या हालचालींची माहिती मिळताच वन विभागाने परिस्थिती गांभीर्याने घेतली. घोट येथील रामटेके यांच्या शेत परिसरात बिबट्याच्या वावराची खात्री झाल्यानंतर तेथे पिंजरा लावण्यात आला. वन कर्मचाऱ्यांनी सतत लक्ष ठेवून बिबट्याच्या हालचालींचा अभ्यास केला. अखेर मंगळवारी पहाटे हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि वन विभागाची मोहीम यशस्वी ठरली.

वन विभागाच्या माहितीनुसार पकडलेला बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे आहे. बिबट्याला पकडल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून पुढील नियमानुसार त्याला सुरक्षित अधिवासात स्थलांतरित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

बिबट्या पकडल्याची बातमी सकाळी परिसरात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. अनेक दिवसांपासून भीतीच्या छायेत वावरणाऱ्या नागरिकांनी वन विभागाच्या या कारवाईचे स्वागत केले. विशेषतः शेतकऱ्यांनी रात्री शेतात जाणे टाळले होते, तर अनेकांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवण्याची खबरदारी घेतली होती. आता बिबट्या पकडल्यामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.

ही कारवाई विभागीय वन अधिकारी राजन तळमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) श्री. तरसे यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, वनरक्षक विकास शिंदे, क्षेत्र सहाय्यक देवगडे, पवन मांढरे, टिंकू मांढरे, राजू कुडमेथे, शैलेश कुरसंगे, अनिल शेंद्रे, किशोर मडावी आणि कपिल झाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news