३० हजाराची लाच घेताना सहायक महसुल अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात Pudhari Photo
चंद्रपूर

Chandrapur bribery Case : ३० हजाराची लाच घेताना सहायक महसुल अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुर्नपडताळणी अहवालासाठी  मागितली लाच

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : येथील जिल्हा पुर्नवसन कार्यालयातील सहायक महसूल अधिकाऱ्याला ३० हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रविवारी (दि.२८) रंगेहाथ अटक केली. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुर्नपडताळणी अहवालासाठी त्याने लाच घेतली असून नरेंद्र विठोबाजी खांडेकर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईनंतर पुन्हा एकदा शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

घडले नेमके काय?

तक्रारदार हे चंद्रपूरचे रहिवासी असून त्यांच्या आईची मालमत्ता औष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर येथे गेलेली होती. याच आधारावर त्यांच्या मुलीचे नाव प्रकल्पग्रस्त म्हणून नोंदविण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत कनिष्ठ अभियंता पदासाठी घेतलेल्या परीक्षेत तक्रारदार यांच्या मुलीची प्रकल्पग्रस्त राखीव जागेतून निवड झाली. या नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुर्नपडताळणी अहवालासाठी खांडेकर यांनी तक्रारदारांकडे २ लाख रुपयांची लाच मागणी केली. तडजोडीनंतर जुलै २०२५ मध्ये तक्रारदारांनी १ लाख रुपये दिले होते, तर उर्वरित ३० हजार रुपये अहवाल पाठविताना देण्याचे ठरले होते.

सापळा रचून अधिकाऱ्याला अटक

तक्रारदारांनी उर्वरित लाचेची मागणी झाल्यानंतर ती देण्याऐवजी थेट अॅन्टी करप्शन ब्युरोकडे धाव घेतली. रविवारी (दि.२८) पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता खांडेकर यांनी ३० हजाराच्या लाचेची मागणी केली.यानंतर आयोजित सापळा कारवाईत खांडेकर यांनी पुर्नवसन कार्यालयातील आपल्या टेबलवर प्रत्यक्ष लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. खांडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कार्यवाही सुरू असल्याचे अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या कारवाईत पोलीस अधीक्षक सागर कवडे व अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पो. हवा. हिवराज नेवारे, विजेंद्र वाढई, पो.शि. अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, राजेंद्र चौधरी, सचिन गजभिये, महेश माहुरपवार, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, चापोशि/सतिश सिडाम, चापोशि संदीप कौरोसे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT