Chandrapur Anganwadi Sevika recruitment (File Photo)
चंद्रपूर

Chandrapur Crime | अंगणवाडी सेविका भरती प्रकरणात फिर्यादीच निघाली आरोपी : महिला अधिकारी व लिपिकाला अटक

नागभीड पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Anganwadi Sevika recruitment irregularities

चंद्रपूर : “दूध का दूध, पाणी का पाणी” या म्हणीप्रमाणे नागभीड पोलिसांनी केलेल्या काटेकोर तपासात एक धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. अंगणवाडी सेविका पदभरती प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या प्रकरणात फिर्यादी ठरलेली महिला अधिकारीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणात महिला अधिकारी व एका लिपिकासह महिला उमेदवाराला अटक करून मोठी कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी नागभीड पोलीस स्टेशनमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी शिला महेंद्र गेडाम यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, करिश्मा आशिष मेश्राम (वय 29, रा. पळसगाव खुर्द) हिने अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करताना एम.ए. अंतिम वर्षाची बनावट गुणपत्रिका सादर केली. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन नागभीड येथे गुन्हा दाखल झाला.

तपासात उघडकीस आलेले धक्कादायक सत्य

या गुन्ह्याचा तपास स.पो.नी. किशोरकुमार वैरागडे यांनी पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला. तपासादरम्यान केवळ उमेदवारच नव्हे तर तक्रारदार श्रीमती शिला महेंद्र गेडाम (बालविकास प्रकल्प अधिकारी, नागभीड) आणि कार्यालयातील लिपिक प्रशांत देवराव खामणकर यांचा देखील प्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघड झाले.

त्यानुसार या प्रकरणात कलम 61(2) भा.दं.वि. ची भर घालून पोलिसांनी 22 सप्टेंबर रोजी शिला गेडाम आणि प्रशांत खामणकर या दोघांना अटक केली. नागभीड पोलिसांच्या तपासामुळे शासनाच्या भरती प्रक्रियेत चालणारे गैरप्रकार उघडकीस आले आहेत. ‘फिर्यादीच आरोपी’ ठरल्याने  प्रशासनात खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक मम्मुका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, तसेच पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले.तपास पथकात स.पो.नी. किशोरकुमार वैरागडे, पो.अं. विक्रम आत्राम व पो.अं. गायकवाड यांनी कसून तपास करत धागेदोरे जोडले आणि अखेरीस आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT