Chandrapur Air Quality  Pudhari
चंद्रपूर

Air Pollution Chandrapur | चंद्रपुरात डिसेंबरमध्ये केवळ १ दिवसच हवा चांगली : ३१ पैकी २९ दिवस हवा प्रदूषित

थंडी व संथ वाऱ्यांमुळे प्रदूषके स्थिर; वाहतूक, कचरा ज्वलन व बायोमास बर्निंग मुख्य कारणे : प्रा. सुरेश चोपणे

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Air Quality

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात हिवाळ्याच्या काळात हवा गुणवत्ता खालावत चालली असून, डिसेंबर २०२५ मध्ये ३१ दिवसांपैकी तब्बल २९ दिवस हवा प्रदूषणाच्या विविध श्रेणींमध्ये नोंदवली गेली आहे. यामध्ये २७ दिवस मध्यम (Moderate) प्रदूषण, २ दिवस खराब (Poor) प्रदूषण, तर केवळ १ दिवस समाधानकारक (Satisfactory) आणि १ दिवस चांगला (Good) हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) आढळला आहे. थंडीचा प्रभाव वाढल्याने संथ वाऱ्यांमुळे प्रदूषके जमिनीच्या स्तरावर स्थिर राहत असल्याने प्रदूषणात वाढ होत असल्याची माहिती पर्यावरण व हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

चंद्रपुरातील हवा गुणवत्ता निर्देशांकाचा अभ्यास दर्शवतो की, 0–50 AQI (Good) श्रेणीत फक्त १ दिवस नोंद झाला, 51–100 AQI (Satisfactory) श्रेणीतही केवळ १ दिवस समाधानकारक स्थिती होती. मात्र, 101–200 AQI (Moderate) म्हणजेच मध्यम प्रदूषित श्रेणीत तब्बल २७ दिवस गेले. 201–300 AQI (Poor) म्हणजेच खराब/जास्त प्रदूषित श्रेणीत २ दिवस नोंदले गेले. 301–400 (Very Poor) व 401–500 (Severe) या अति धोकादायक श्रेणीमध्ये एकही दिवस गेला नाही, ही काहीशी दिलासादायक बाब असली तरी शहरातील हिवाळी प्रदूषणाचा स्तर चिंताजनक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

डिसेंबरमध्ये सर्वाधिक प्रभावी प्रदूषक म्हणून धूलिकण PM10 ची नोंद २९ दिवस झाली. PM2.5 फक्त १ दिवस, तर कार्बन मोनॉक्साईड (CO) देखील १ दिवस प्रभावी आढळला. या आकडेवारीवरून वाहनांची वाढती संख्या, रस्त्यावरील धूळ आणि कचरा/बायोमास ज्वलन हे प्रदूषणाचे प्रमुख स्रोत असल्याचे चोपणे यांनी सांगितले आहे.

प्रा. चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, थंडीमुळे व वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने प्रदूषके वाहून न जाता एकाच भागात साठतात. परिणामी श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणामुळे दमा, ब्रॉन्कायटिस, टीबी, हृदयविकार तसेच मानसिक आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी पोषक मानला जात असे, मात्र आता वाढत्या प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रदूषणाची प्रमुख कारणे:

◾औष्णिक विद्युत केंद्र (Thermal Power Plant)

◾औद्योगिक उत्सर्जन व घरगुती कोळसा ज्वलन

◾वाहनांचा धूर, रस्त्यावरील धूळ

◾कचरा ज्वलन व बायोमास बर्निंग

◾बांधकाम व स्थानिक व्यावसायिक उपक्रम

प्रदूषण नियंत्रणासाठी उपाय:

पर्यावरण अभ्यासकांनी प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन केले आहे. यात प्रामुख्याने:

◾वृक्ष लागवड व हरित पट्ट्यात वाढ

◾सायकल व सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे

◾बॅटरी/इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन

◾कचरा ज्वलनावर पूर्ण बंदी व कडक दंडात्मक कारवाई

◾उद्योगांनी प्रदूषण प्रतिबंधक यंत्रणा सक्षम करणे

स्मॉग टॉवर, फॉग मशीन आणि कृत्रिम पाऊस हे तात्पुरते उपाय असले तरी प्रशासनाने कडक धोरण राबवले तरच प्रदूषण नियंत्रण शक्य असल्याचे मत प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले.

डिसेंबरमधील ही आकडेवारी शहरातील हवेच्या बिघडलेल्या गुणवत्तेची धोक्याची घंटा असून, नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणीय संतुलन वाचवण्यासाठी तातडीने प्रभावी अंमलबजावणीची मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT