Sighting of a tiger near Mangrud
गोविंदपूर मार्गावरील मांगरूड जवळील वळणावर शेतकऱ्यासमोर अचानक वाघोबा उभे ठाकले.   Pudhari News Network
चंद्रपूर

Chandrapur News | थरारक ! शेतकऱ्यासमोर अचानक आले वाघोबा; मदतीला धावली एसटी

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : ताडोबा आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर वाघांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे वाघोबा कुठे, केव्हा दिसेल ? हे सांगता येत नाही. वाघ म्हटला तरी धडकी भरते. आणि प्रत्यक्षात जर अचानक समोर आला. तर नक्कीच बोबडी वळल्याशिवाय राहणार नाही. मंगळवारी सायंकाळी नागभीड तालुक्यात अशीच एक घटना समोर आली आहे. गोविंदपूर मार्गावरील मांगरूड जवळील नागमोडी वळणावर शेताकडे आलेल्या एका शेतकऱ्यासमोर परत जाताना अचानक वाघोबा उभे ठाकले. (Chandrapur News)

मांगरूड ते गोविंदपूर मार्गावर वाघोबाचे दर्शन

सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे. पावसातच शेतकऱ्यांचे आपापल्या शेतातील रोवणी आटोपण्याकडे लक्ष लागले आहे. पावसातही शेतकरी शेतावर जावून रोवणीची तयारी करीत आहेत. मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास खानदेवे हा शेतकरी मांगरूड शिवारातील शेतावर सायकलने आला होता. शेतावरील काम आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेतकरी आपल्या गोविंदपूर या गावी सायकलने जायला निघाला. मांगरूड ते गोविंदपूर या मार्गाने नहरच्या समोरील नागमोडी वळणावर जाणार इतक्यातच अचानक वाघोबा जंगलातून रस्त्यावर आले. दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले. दोघांच्याही मागेपुढे कुणीच नव्हते. काय करावे, काय नाही सुचनासे झाले. प्रत्यक्ष वाघोबाच समोर उभा असल्याने शेतकरी नि:स्तबध्द झाला. जिवाचे काही बरेवाईट होईल तेवढ्यातच मांगरूड वरून गोविंदपूरकडे जाणारी एसटी बस आली. वाघ आणि शेतकरी दोघेही एकमेकांसमारे उभे असल्याचा थरारक प्रसंग त्यांनी बघितला. लगेच चालकाने एसटी थांबविली. शेतकऱ्याला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. (Chandrapur News )

वाघोबा - शेतकऱ्याच्या थरारक प्रसंगाची चर्चा

क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्याला एसटी बसमध्ये बसविण्यात आले. त्याची सायकलही एसटीत घेण्यात आली. एसटी बस मुळे वाघोबा क्षणात त्या ठिकाणावरून जंगलाच्या दिशेने निघून गेले. "वेळ आली होती पण, काळ आला नव्हता " त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला. एसटी बस गोविंदपूर गावात पोहचली आणि त्या शेतकऱ्याला गावात सोडण्यात आले. यावेळी शेतकरी प्रत्यक्षात वाघोबालाच समोर पाहून काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. एसटी चालक व वाहकाने हा सगळा प्रकार गावात सांगितल्यानंतर वाघोबा आणि शेतकऱ्याच्या थरारक प्रसंगाची चर्चा गावात चांगलीच रंगली होती.

SCROLL FOR NEXT