Drug Smuggling in Chandrapur Pudhari
चंद्रपूर

Ganja Seized Chandrapur | ओडिशातून आणलेला ५.७४९ किलो गांजा चंद्रपुरात जप्त

बल्लारपूर-बामणी मार्गावर एलसीबीची कारवाई; दोन आरोपी ताब्यात, ३.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Drug Smuggling in Chandrapur

चंद्रपूर : अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक व विक्रीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सुरू केलेल्या मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५.७४९ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून गांजासह दोन मोबाईल, रोख रक्कम व बॅग असा एकूण ३.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ४ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दोन व्यक्ती बल्लारपूरहून बामणीमार्गे चामोर्शीच्या दिशेने गांजाची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राजपत्रित अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत बल्लारपूर-बामणी मार्गावरील होंडा शोरूम तथा जिओ सेंटर परिसरात सापळा रचण्यात आला.

५ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे २.३५ वाजता पोलिसांना मिळालेल्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या दोन व्यक्ती लाल-काळ्या रंगाच्या बॅगा घेऊन बामणीकडे जाताना दिसल्या. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांनी मंगेश संतोष उंदीरवाडे (२३, रा. सोनापूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) आणि सागर बाबूराव मरगडे (१९, रा. निमगाव, ता. पवनी, जि. भंडारा) अशी नावे सांगितली.

राजपत्रित अधिकारी व पंचांसमक्ष त्यांच्या बॅगांची झडती घेतली असता ब्राऊन पॅकिंग टेपने गुंडाळलेली पार्सल्स तसेच सुटा गांजा आढळून आला. पोलिसांनी एकूण ५.७४९ किलो गांजा, दोन मोबाईल फोन, ३,८०० रुपये रोख रक्कम आणि बॅग असा सुमारे ३.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ओडिशातून गांजा आणल्याचे निष्पन्न

प्राथमिक चौकशीत जप्त केलेला गांजा ओडिशा राज्यातून आणल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजा तस्करीच्या या साखळीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गोरकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT