चंद्रपूर - वरोरा येथील अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या अधिराज आकाश भागडे याने आपल्या छोट्या हातांनी शाडू मातीपासून गणपती बाप्पाची आकर्षक मूर्ती साकारली आहे. गणेशमूर्ती तयार करण्याची उत्सुकता मनात निर्माण झाल्यानंतर त्याने स्वतःच्या कल्पनेतून बाप्पाची मूर्ती घडवली. अधिराजच्या या अनोख्या कलाकृतीतून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा तसेच लहान मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याचा सुंदर संदेश मिळत आहे.
मूळचे वरोरा येथील आकाश भागडे हे व्यवसायानिमित्त नागपूर येथे वास्तव्यास आहेत. वरोरा येथी बाबा ऊर्फ सुभाष भागडे यांचा आकाश हा मुलगा असून, अधिराज हा त्यांचा तीन वर्षांचा मुलगा आहे. अधिराजला चितारओळीतील गणपतीच्या मूर्ती कशा तयार केल्या जातात, हे पाहण्याची उत्सुकता होती. मोठमोठ्या गणेशमूर्ती तयार होताना पाहून त्याच्या मनातही आपण स्वतः गणपतीची मूर्ती का बनवू नये, असा विचार आला. त्याने ही इच्छा आई-वडिलांकडे व्यक्त केली. त्यानंतर शाडूमाती हातात घेत त्याने स्वतःच्या कल्पनेतून बाप्पाची मूर्ती साकारण्यास सुरुवात केली.
छोटीशी सोंड, मोठे कान, चेहऱ्यावरील भाव यांसह अधिराजने बाप्पाला सुंदर आकार दिला. बाप्पाच्या हातात मोदक ठेवतानाही त्याने विशेष काळजी घेतली. मूर्ती घडविताना त्याचे छोटे हात शाडूमातीने माखलेले पाहून कुटुंबीयांनाही मोठा आनंद झाला. मूर्ती तयार करण्यासाठी वडिलांनी केवळ थोडीफार मदत केली असून, मूर्तीची संकल्पना आणि निर्मिती अधिराजनेच केली असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
अधिराजने साकारलेली ही गणपतीची मूर्ती त्याच्यासाठीच नव्हे, तर कुटुंबीयांसाठीही अनमोल आठवण ठरली आहे. विशेष म्हणजे, शाडूसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून गणपतीची मूर्ती घडविण्याच्या या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेशही दिला आहे.
लहान वयात अशा कलात्मक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याने मुलांच्या सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वासाला चालना मिळते. मोबाईल आणि टीव्हीपासून काही काळ दूर राहून मुलांनी कला व सर्जनशील उपक्रमांमध्ये रमावे, याचेही अधिराजच्या प्रयत्नातून उदाहरण समोर आले आहे. संस्कृती, कला आणि पर्यावरणाची जाणीव बालवयापासूनच मुलांच्या मनात रुजावी, या दृष्टिकोनातून अधिराजचा हा छोटासा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. बाप्पावरील प्रेम, कलात्मकतेची आवड आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी त्याची ही शाडूमातीची मूर्ती परिसरात आकर्षणाचा विषय ठरली आहे.