चंद्रपूर: मालमत्ता आणि सोन्याचे दागिने विक्रीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल १ कोटी १३ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वरोरा येथील विनोद सोयाम व त्यांची पत्नी पायल सोयाम यांच्याविरुद्ध वरोरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
वरोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील शिवकुमार रामचंद्र गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. आरोपी विनोद सोयाम व पायल सोयाम यांनी वरोरा आणि नागपूर येथील बंगला, प्लॉट तसेच सुमारे २०० ग्रॅम सोन्याचे दागिने विक्रीस असल्याचे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला.
या व्यवहाराच्या मोबदल्यात आरोपींनी तक्रारदाराकडून रोख रक्कम तसेच धनादेशाद्वारे एकूण १ कोटी १३ लाख ५० हजार स्वीकारले. मात्र, संपूर्ण रक्कम घेतल्यानंतरही मालमत्तेची कागदपत्रे किंवा सोन्याचे दागिने तक्रारदाराच्या ताब्यात दिले नाहीत. उलट वारंवार टाळाटाळ करून व्यवहार पूर्ण करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवकुमार गुप्ता यांनी वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विनोद सोयाम व पायल सोयाम यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तरवार करीत आहेत.