चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा : किनवट वरून चंद्रपूरला येत असलेल्या एसटी बसचा गडचांदूरजवळ आज (दि.१८) भीषण अपघात झाला. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून बस दहा फूट खोल खड्ड्यात उतरल्याने बसमधील ७ ते ८ प्रवासी जखमी झाले. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. (Chandrapur Accident News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही किनवट आगाराची आहे. आज सकाळी बस चंद्रपूरकडे निघाली होती. गडचांदूर शहराजवळ अचानक एक दुचाकी स्वार समोर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले. सर्वप्रथम दुचाकीला जबरदस्त धडक झाली. त्यानंतर बस डिव्हायडर वरून 10 फूट खाली उतरली. यात चालकाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. तर बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी प्रवाशांना गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.