Anandwan New Building Fund Pudhari
चंद्रपूर

Anandwan | आनंदवनच्या ‘आनंद निकेतन’ला आर्थिक भार सहन होईना: नवीन इमारतीसाठी १२५ कोटींची गरज

महाविद्यालय हस्तांतरणासाठी सक्षम संस्थांकडून स्वारस्य प्रस्ताव मागविले

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Anandwan New Building Fund

चंद्रपूर : कुष्ठरोग्यांच्या सेवेतून माणुसकीला नवा अर्थ देणाऱ्या वरोरा येथील आनंदवनच्या भूमीत गेली ६२ वर्षे ज्ञानदान करणाऱ्या ‘आनंद निकेतन’ महाविद्यालयावर आर्थिक संकटाची छाया दाटली आहे. महाविद्यालयाची जीर्ण झालेली इमारत पाडून नवीन इमारत उभारण्यासाठी तब्बल १०० ते १२५ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. मात्र, एवढा मोठा निधी उभारणे शक्य होत नसल्याने महाविद्यालयाचा कारभार सक्षम संस्था किंवा व्यवस्थापनाकडे सोपविण्याचा पर्याय पुढे आला आहे. यासाठी महारोगी सेवा समितीने इच्छुक संस्थांकडून स्वारस्य प्रस्ताव मागविले आहेत.

मॅगसेसे पुरस्कारप्राप्त समाजसेवक बाबा आमटे यांनी सुरू केलेले ‘आनंद निकेतन’ महाविद्यालय हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर मजल मारली आहे. सध्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून सुमारे अडीच ते तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात १०० हून अधिक प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत.

महाविद्यालयाच्या इमारतीला तब्बल ६२ वर्षे पूर्ण झाली असून ती जीर्ण झाली आहे. त्यामुळे नवीन इमारत उभारणे अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी १०० ते १२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, महारोगी सेवा समितीकडे एवढा निधी उपलब्ध नाही. एकीकडे मोठ्या प्रमाणात निधी उभारण्याचे आव्हान असताना दुसरीकडे बदललेले कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाचे (सीएसआर) निकष आणि उद्योगांकडून अपेक्षित निधी मिळविण्यात येणाऱ्या अडचणींमुळे आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

महाविद्यालय अनुदानित असल्याने ते बंद करणे हा पर्याय नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था किंवा व्यवस्थापनाकडे महाविद्यालयाचा कारभार सोपविण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT