Farmer Loan Waiver Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Loan Waiver | ‘अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती’ साठी चंद्रपूर जिल्ह्यातील 43 हजार 816 शेतकरी पात्र

 सीडीसीसी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड;  शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Ahilyadevi Holkar Karzmukti Yojana

चंद्रपूर : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (सीडीसीसी) 43 हजार 816 पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा आणि खरीप हंगामात पुन्हा पीक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी दिली.

आजही शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असला तरी अनियमित पाऊस, पूर, अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जासाठी, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जावर शासनाकडून 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच 2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत बँकेत जमा केल्यास शासनाकडून अतिरिक्त 2 लाख रुपये कर्जमाफीची रक्कम बँकेत जमा केली जाईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचीही तरतूद आहे.

योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि आधार क्रमांकावर आधारित आहे. सीडीसीसीच्या एकूण 43,862 खातेदारांपैकी 43,816 पात्र खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून उर्वरित 46 खात्यांमध्ये आधार प्रमाणीकरण आणि तांत्रिक अडचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तालुकानिहाय अपलोड झालेल्या खातेदारांमध्ये चिमूर तालुका सर्वाधिक 5,451 खातेदारांसह आघाडीवर असून त्यापाठोपाठ कोरपना (5,663), ब्रम्हपुरी (4,670), वरोरा (4,076) आणि नागभीड (3,851) या तालुक्यांचा समावेश आहे.

दरम्यान, योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक किंवा यादीतील विशिष्ट क्रमांकासह ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा संबंधित बँकेत जाऊन बायोमेट्रिक व आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT