चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: रस्ता ओलांडणाऱ्या एका बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. अज्ञान वाहनाच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल रविवारी (10 सप्टेंबर) रात्री ८ वाजताचे सुमारास मूल ते राजोली मार्गावरील चितेगावजवळ घडली.
काल रविवारी रात्री आठच्या सुमारास पाऊस सुरू होता. दरम्यान मूल ते राजोली मार्गावरील चितेगावजवळ एक बिबट्या रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान रस्त्यारून जात असणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिली. यामध्ये बिबट्या जागीच ठार झाला. पाऊस सुरू असल्याने रस्ता क्रॉस करताना, बिबट्याला दिसले नसावे. त्यामुळे धडक लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
ज्याठिकाणी ही घटना घडली, त्या परिसरात बिबट्या आणि वाघाचा संचार आहे. अनेकांना त्यांचे दर्शन झाले आहे. हा जिल्ह्यातील प्रमुख मार्ग आहे. या मार्गाने वाहने भरधाव जातात. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या जीवितास धोका होऊ नये, याकरिता उपाय योजना करण्याची मागणी वन्य प्रेमी करित आहेत. सदर घटनेनंतर राजोली वनविभागाने बिबट्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.