चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमध्ये ११ वनपरिक्षेत्रामध्ये सोमवारी (दि.१२) बुध्द पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या वन्यप्राणी प्रगणनेत ५६ वाघ,७ बछडे, १२ बिबट, १ तडस व ९३ अस्वल आढळून आली. दोन्ही क्षेत्रात ५५०२ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही झोनमध्ये एका वाघाची व २८ अस्वलांची संख्या वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बिबटाची संख्या ५ ने कमी झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी ७ बछड्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. मागील वर्षी पेक्षा यावेळी ६ बछड्यांची वाढ झाली आहे. तसेच १ तडसाचीही नोंद घेण्यात आली आहे.
बुध्द पौर्णिमेच्या रात्री पाणवटा आधारित वन्यप्राणी प्रगणना सोमवारी सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ताडोबातील कोअर व बफर झोनमध्ये पार पडली. कोअर झोनमध्ये ५ वनपरिक्षेत्रात ९५ मचाणी तर बफर झोनमध्ये ६ वनपरिक्षेत्रात ८१ मचाणी उभारण्यात आल्या होत्या. बफरमध्ये राज्यभरातील १६२ पर्यटनप्रेमींनी निसर्गानुभवाचा आंनद घेत चंद्राच्या लख्ख प्रकाशात १७७६ नोंदी घेतल्या तर कोअर झोनमध्ये वनाधिकारी व क्षेत्रीय वन कर्मचा-यांनी प्राणी गणना करून ३७४६ वन्यप्राण्यांच्या नोंदी घेतल्या. कोअर व बफर क्षेत्र मिळून ५६ वाघ, १२ बिबट, ७ बछडे, १ तडस, ९३ अस्वल, ९६ रानकुत्रे, १६९७ चितळ, ५३३ सांबर, ५८२ रानगवे ९८ भेंडकी, २७ चौसिंगा, ८७ निलगाय आणि अन्य मांसभक्षी व तृणभक्षी २१४४ असे एकूण एकूण ५५२२ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.
बफरझोनमध्ये वाघ १७ आढळून आले असून ७ बछड्यांचा समावेश आहे. मागील वर्षी फक्त २६ वाघ आढळून आले होते. यावेळी ९ ने वाघाची संख्या घटली आहे. ३ बिबटे आढळून आले असून त्यांची संख्या ५ ने कमी झाली आहे. अस्वलाची संख्या तब्बल ४३ झाली असून मागील वर्षीपेक्षा अस्वलांच्या संख्येत ११ ने वाढ झाली आहे. तृणभक्ष्यी प्राण्यांमध्ये भेडकी १२, चितळ ४८८, सांबर १६८, चौसिंगा २०, निलगाय ६३, रानगवा २८२ असे एकूण १०३३ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. तसेच वानर ३२३, रानडुक्कर १०९, रानकुत्रा १०, साळिंदर ४, मुंगूस ३८ असे एकूण आढळून आले. मांजर प्रकारामध्ये जवादी मांजर १५, उदमांजर ४, रानमांजर ३, सायाळ ४, मुंगूस ३८, चिंकारा १३ तर इतर ३२ असे एकुण १७५६ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. यावेळी १०१ मोरांची संख्या आढळून आली. चिकारा, खवल्या मांजर, कोल्हा व तडसाची नोंद झाली नाही. सर्वात जास्त वन्यप्राणी पळसगाव वनपरिक्षेत्रात ५४५, त्यापाठोपाठ खडसंगी मध्ये ३९४, चंद्रपूर २७३, मोहूर्ली १९९, मुल १८६ तर शिवणी १५९ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली.
कोअर झोनमध्ये ३९ वाघ, ९ बिबटे, ८६ रानकुत्रे, ५० अस्वले यांची नोंद करण्यात आली. तसेच ३०० रानगवे, १२४९ चितळ, ३८५ सांबर, ८६ भेंडकी, २४ निलगाय आणि मांसभक्षी, तृणभक्षी व अन्य १५१० असे एकूण ३,७४६ प्राण्यांची नोंद झाली आहे. मागील मागील वर्षीच्या तुलनेत वाघांची संख्या १० ने वाढली आहे. अस्वलाची संख्या १७ ने वाढली आहे. बिबटची संख्या जैसे थे आहे. ताडोबात मोरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. बफर मध्ये १०१ तर कोअर झोनमध्ये ४५० मोरांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.